सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जिल्हावासियांना सूर्यनारायणाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागले आहे. सोमवारी दुपारपर्यंत तापमानाचा पारा तब्बल ४३ अंशापर्यंत चढला होता. शिमगोत्सव तोंडावर असतानाच वैशाखाच्या झळाही फाल्गुनात पोहचू लागल्या आहेत. त्यामुळे हा पारा आणखीनच वाढणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.सिंधुदुर्गात प्रामुख्याने एप्रिलनंतर वातावरणातील तापमान ३९ ते ४० अंशापर्यंत जाते. तोपर्यंत हवेतील आर्द्रताही टिकून राहते. असे असताना मार्च महिन्यापासूनच जिल्हावासियांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. या वाढत्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले असून दुपारच्या सत्रात शहरातील, महामार्गातील रस्ते ओस पडू लागल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.तापमानवाढीला सिंधुदुर्गच अपवाद नसून संपूर्ण महाराष्ट्रात हा पारा वाढतच चाललेला आहे. मराठवाडा, विदर्भात तर भयावह स्थिती आहे. त्याठिकाणी ४१ ते ४४ अंशापर्यंत तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जर आज ही स्थिती असेल तर एप्रिल व मे महिन्यात सूर्य आणखीनच पारा चढवणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. कडक ऊन पडत असल्यामुळे प्रमुख बाजारपेठांमधील रस्ते दुपारच्या वेळी सुने-सुने वाटत आहेत. (प्रतिनिधी)थंड पेयाच्या दुकानांवर गर्दी : लिंबू सरबत, ऊसाचा रस, कलिंगडांना मागणीवाढत्या उन्हाच्या माऱ्यामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांनी शरीराला काहीशी ऊर्जा मिळावी यासाठी ठिकठिकाणी थाटण्यात आलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी लिंबू सरबत, ऊसाचा रस, कलिंगड आदी थंडपेयांची दुकाने ठिकठिकाणी थाटली असल्याचे दिसून येत आहे. दिवसा उष्ण तर रात्री थंड गारवासकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत वातावरणात थंडावा असतो. मात्र त्यानंतर वातावरणात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते. मोटारसायकलने प्रवास करताना तोंडाला स्कार्फ व हेल्मेटचा वापर करताना तरुणाई दिसून येत आहे. चालतानादेखील स्कार्फ व छत्री घेतल्याशिवाय सर्वसामान्य बाहेर पडताना दिसत नाहीत. दिवसा जरी उष्मा असला तरी त्याचा प्रभाव साधारणत: संध्याकाळी साडेचारनंतर ओसरू लागतो व रात्री मात्र वातावरणात गारवा पसरल्याचे चित्र असते.पाणीटंचाईची भीतीदिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेच्या प्रमाणामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावात आहे. त्यामुळे आता उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात घट होत आहे. यावर्षी दरवर्षी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच कडक उन्हाळ्यामुळे लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.
सिंधुदुर्गात पारा ४३ अंशावर
By admin | Published: March 22, 2016 12:32 AM