सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ नदी व खाडी परिसरातील एकूण ४३ गावे ही पूरबाधित गावे म्हणून जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. आगामी पावसाळी हंगामात या गावांना पुरापासून कोणताही धोका निर्माण होऊ नये तसेच धोका निर्माण झाल्यास या गावांना तात्काळ मदत मिळावी यासाठीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून आपत्ती नियंत्रण विभाग सज्ज झाला आहे. प्रशासनाकडे फायबर बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ बोयज यासारख्या बचाव साधनसामुग्री उपलब्ध असून आठही तालुक्यामध्ये १ जून ते १४ आॅक्टोबर या कालावधीत २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली तरी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमीच दक्ष असतो. शोध व बचाव साहित्य सामुग्री पुरेशी असून नवनवीन साहित्य खरेदी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणे, जनजागृती यासाठी शासनाकडून लाखो रूपये निधी प्राप्त होत असून त्याचा योग्य विनियोग आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून होत आहे. त्यामुळे एखादी आपत्ती उद्भवली तरी जिल्हा आपत्ती निवारण विभाग मात्र त्याला तोंड देण्यास नेहमीच सक्षम असतो. जिल्ह्यातील १४ नदी व खाडीपात्रानजिक असणार्या ४३ गावांना जुलै ते आॅगस्ट या दरम्यान पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही गावे पूरबाधित म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहे. या गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. संभाव्य पूरबाधित गावे कुडाळ तालुका- कुडाळ, पावशी, बाव, चेंदवण, सरंबळ. वेंगुर्ला तालुका- केळूस, कालवी, होडावडा परबवाडी, सुभाषवाडी, चिपी, कर्ली. मालवण तालुका- मसुरे, मर्डे, बांदिवडे बुद्रुक, माळगाव, बागायत, चिंदर अपराजवाडी. सावंतवाडी तालुका- इन्सुली, बांदा, शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोस. देवगड तालुका- मणचे, मालपेवाडी, मुस्लिमवाडी, धालावल मुस्लिमवाडी, कोर्ले. कणकवली तालुका- खारेपाटण बाजारपेठ, बंदर गाव, कलमठ, वरवडे, फणसनगर, जानवली. वैभववाडी तालुका- उंबर्डे, कुसूर, नापणे, कोकिसरे घंगाळेवाडी, नाधवडे इनामदारवाडी, सोनाळी ही गावे संभाव्य पूरबाधित गावे म्हणून जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. बचाव साधन सामुग्री पावसाळी हंगामात उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे फायबर बोट्स- ८, लाईफ जॅकेट्स- २८४, लाईफ बोयज- २७३, अॅल्युमिनियम लॅडर- १०, अॅल्युमिनियम स्ट्रेचर्स- १०, चैन सॉ मशिन- ३, बॅटरी- १६ अशाप्रकारे साहित्य उपलब्ध असून त्याचे तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहे. १०७७ ही हेल्पलाईन सुरू एखादी आपत्ती उद्भवल्यानंतर त्याची थेट माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने १०७७ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
४३ गावे पूरबाधित म्हणून निश्चित
By admin | Published: May 26, 2014 12:47 AM