वैभववाडी : वार्षिक गावपळणीसाठी सोमवारी वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावाच्या हद्दीत दाखल झालेले शिराळेवासीय ग्रामदेवतेचा कौल घेऊन शनिवारी पुन्हा घराकडे परतले. त्यामुळे पाच दिवस सुने-सुने असलेले शिराळे गाव शनिवारी पुन्हा गजबजून गेले.शिराळे गावच्या वार्षिक गावपळणीला सुमारे ४५० वर्षांची परंपरा आहे. पौष महिन्याच्या सुरुवातीला ग्रामदैवत श्री गांगोचा कौल घेऊन गावपळण केली जाते.
या प्रथेप्रमाणे ग्रामदैवत श्री गांगो देवाचा कौल होताच सोमवारी दुपारी शिराळे आबालवृध्दांनी पाळीव प्राणी, पक्ष्यांसह गाव सोडत सडुरेच्या हद्दीतील दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी उभारलेल्या झोपड्यांमध्ये मुक्काम ठोकला होता.
सुमारे साडेतीनशे लोकवस्तीचे शिराळे गाव पाच दिवस पूर्णपणे निर्मनुष्य होते. शनिवारी श्री देव गांगेश्वराने कौल दिल्याने संध्याकाळी शिराळेवासीय गावात परतले असून ग्रामदेवतेच्या परवानगीनुसार नाडेघोरीप कार्यक्रमाचे वार्षिक पार पाडले जाणार आहे.