ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून पासून आतापर्यंत १५२ घरांचे , २३ गोठ्यांचे व इतर मालमत्तेचे मिळून ४९ लाख ६२ हजार ८६० रुपयाचे अतिवृष्टिमुळे नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. १ जून पासून जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे १५२ घरांचे व २३ गोट्यांचे नुकसान झाले आहे. तर इतर १३ मालमत्ताचे नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये ६ घरे पूर्णपणे जमीन दोस्त झाली आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार ८६० रुपये एवढे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.या नुकसानीमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील २, कुडाळ तालुक्यातील १ आणि देवगड तालुक्यातील ३ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी त्यापूर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांची व गोट्यांची तसेच सार्वजनिक मालमत्तेची नुकसान झाले आहे.जिल्ह्यात १५२ घरांची पडझडजिल्ह्यातील १२७ पक्क्या घरांची तर २५ कच्च्या घरांची अशाप्रकारे १५२ घरांची पडझड झाली आहे. २३ गोठे आणि १३ इतर मालमत्ता यांची नुकसानी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला ,कुडाळ आणि देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १ जून पासून आतापर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे १२७ पक्क्या घरांचे ३३ लाख ८० हजार ११० रुपये नुकसान झाले आहे. २५ कच्च्या घरांचे ४ लाख ९० हजार एवढे नुकसान झाले आहे. तर २३ गोठ्यांचे ५ लाख ६९ हजार ६५०रुपये एवढे नुकसान झाले आहे. दुकाने,स्टॉल अश्या इतर १३ मालमत्तांचे ५ लाख २३ हजार १००रुपये असे मिळून आतापर्यंत एकूण ४९ लाख ६२ हजार ८६० रुपये नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 4:11 PM