आमदारांना ५० खोके अन् लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे; अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल
By अनंत खं.जाधव | Published: October 5, 2024 04:24 PM2024-10-05T16:24:32+5:302024-10-05T16:25:30+5:30
आमदार दमदार हवा, गद्दार नको; अमोल कोल्हे यांचे मंत्री केसरकरांवर टीकास्त्र
सावंतवाडी : प्रत्येक मतदाराला आपल्या आमदारांची कामगिरी दमदार व्हावी असेच वाटत असते. पण आपला आमदार दमदार नसून तो गद्दार आहे जनतेला कळून चुकले आहे. आमदारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रूपये हे कसे काय? असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार टाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. येथील आमदारांची जादू आता चालणार नाही. 'आता बदल हवो तर आमदार नवो' म्हणत जनतेला साद घालत, काम करणाऱ्याला निवडून पाठवा असे आवाहन कोल्हे यांनी यावेळी केले.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडीत आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला तसेच अर्चना घारे-परब यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी कोल्हे म्हणाले, मंत्री केसरकर यांची अवस्था जादुगारा सारखी झाली आहे. पण आता ही जादू चालणार नाही.
..त्यामुळेच मालवणमधील पुतळा पडला
महाराष्ट्रात एक फुल्ल दोन हाफ आहेत. त्यांनी महाराजांचे विचार सोडले त्यामुळेच मालवणमधील पुतळा पडला. या सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला असून त्यातून महाराजांना ही सोडले नाही. असा आरोप करत यांनी पन्नास खोके घेतले आणि लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रूपये देता. मुलांना गणवेश मिळत नाही. दोन वर्षे तोच गणवेश घालतात यावरून येथील शिक्षण मंत्र्यांनी बोध घ्यावा. हवेतील बाता करू नये. लाडका कॉन्ट्रकटर कुठे आहे. मुलांना गणवेश कधी मिळणार कि हे सर्व सावंतवाडीतील विकास कामासारखे आहे असा सवालही कोल्हे यांनी केला. त्यामुळेच आता जनतेला बदल हवो तर आमदार नवो असे म्हणत केसरकरांची खिल्ली उडवली.
आमदार दमदार हवा, गद्दार नको
जनतेला कळून चुकले आहे की त्याच त्या घोषणा ऐकून जनता कंटाळली आहे. त्यामुळेच येथे बदल घडवण्याचे काम सावंतवाडीतील जनतेचे आहे. आमदार दमदार हवा पण गद्दार नको त्यामुळे गद्दारांना धडा शिकवा असे आवाहनही कोल्हे यांनी केले. यावेळी प्रसाद रेगे, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, विशाल जाधव, सावली पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, काशीनाथ दुभाषी, विवेक गवस, हिदायतुल्ला खान, रवींद्र चव्हाण, सायली दुभाषी, समीर आचरेकर, देवेंद्र पिळणकर, सुनीता भाईप, ऋत्विक परब नवल साटेलकर उपस्थित होते
'जॅकेटवाला जादूगार बदलूया'
सावंतवाडीत एक खराखुरा जादूगार आला आहे. तर दुसरीकडे जॅकेटवाला जादूगार आहे. या जॅकेटवाला जादूगार लोकांना आपली जादू दाखवतो. पण लोकांच्या हातांना काम नाही तर ही जादू काय कामाची आता या जॅकेटवाला जादूगार बदलूया आणि अर्चना घारे-परब ना निवडणून आणूया असेही कोल्हे म्हणाले.