सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे यंदा दहावे वर्ष असून, पाचही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येत असून यंदाचा महोत्सव लोकार्षणाचा उच्चांक निर्माण करणारा ठरेल. यंदाच्या महोत्सव उद्घाटनासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, सुभाष पणदूरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत, योगिता मिशाळ, शुभांगी सुकी, वैशाली पटेकर, साक्षी कुडतरकर आदी उपस्थित होते. पर्यटन महोत्सवाला सुरूवात बुधवार २३ रोजी सायंकाळी ६ वाजता नगर परिषदेच्या येथील बोट क्लबकडे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर मोती तलावातील तरंगत्या शोभायात्रेचे उद्घाटन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चपई नृत्य, पालखी नृत्य, ढोल पथक, आतषबाजी, रोषणाई करण्यात येणार आहे. ७ वाजता ओडिसी शास्त्रीय नृत्य-गंगातरंग व दशावतार आणि पुणेरी दर्जेदार लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. ७.३० वाजता कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. रात्री ८.३० वाजता पूजा पूनम प्रस्तुत सुपर हिट लावण्यांचा ‘या रावजी बसा भावजी’ कार्यक्रम होईल. गुरूवार २४ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० वेळेत विविध सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्यांचे कार्यक्रम, ७.३० ते १० या वेळेत भावगीते, भक्तीसंगीत व नाट्यसंगीत आधारीत प्रसिध्द तबलावादक साई बँकर्स पुणे प्रस्तुत ‘भावभक्ती सरगम’ कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार २५ रोजी सायंकाळी ६ ते ७ पद्मकोष कथ्थक पुणे प्रस्तुत आंतरराष्ट्रीय कथ्थक नृत्यांगना सोनल पाटील व सहकारी यांचा बहारदार कार्यक्रम, ७ ते ९ स्वरनिनाद प्रस्तुत ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा मराठी, हिंदी गीतांचा नृत्याविष्कारासह बहारदार नजराणा सादर होणार आहे. रात्री ९ ते १२ ‘म्युझिक मेलोडिज’ विश्वजीत बोरवणकर, कीर्ती किल्लेकर, रसिका जानू, जयदीप भगवडकर इत्यादी कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वेळेत दत्तप्रसाद महिला मंडळ, भटवाडी प्रस्तुत फुगडीचा कार्यक्रम, ७ ते ९ ‘तियात्र-आमचा विश्वास’, तर रात्री ९ ते १२ वेळेत आॅर्केस्ट्रा ‘स्वरबहार मुंबई’ हा कार्यक्रम होणार आहे. रविवार २७ रोजी ६.३० ते ८.३० या वेळेत लोकनृत्यांवर आधारीत ‘महाराष्ट्राची लोककला’ हा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत आई प्रस्तुत जल्लोष २०१५-चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम, विनित भोंडे, प्राजक्ता माळी, अक्षता सावंत, दिगंबर नाईक व इतर २५ नृत्यकलाकारांचा बहारदार कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. (वार्ताहर)‘चालताबोलता’ उपक्रम४या महोत्सवात महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’, तर सर्व रसिकांसाठी ‘चालताबोलता’ हा कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठाची जागा मुख्य व्यासपीठाच्या समोरच मँगो टू हॉटेलनजीक करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कदम करणार आहेत. ‘खेळ पैठणीचा’ खेळातील विजेत्या महिलांसाठी पाच पैठण्या, तर ‘चालताबोलता’ खेळात सुमारे दोनशेच्यावर बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती बबन साळगावकर यांनी यावेळी दिली.
महोत्सवात पाचही दिवस भरगच्च कार्यक्रम
By admin | Published: December 22, 2015 1:18 AM