कणकवली : सिंधुदुर्गात तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची कोलमडलेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही १५ हजार ९०० वीज कनेक्शन सुरू होणे बाकी आहेत तर ६ गावे अजूनही अंधारात आहेत.चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ४३९ गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील ४३३ गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून अजूनही ६ गावे अंधारात आहेत. ट्रान्सफॉर्मर ३४२१ पैकी ३३७२ सुरू असून ४९ सुरू होणे बाकी आहेत. काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत.तर एकूण वीज कनेक्शन ३ लाख ६ हजार ६११ पैकी २लाख ९० हजार ७११ सुरू झाली असून अद्याप १५ हजार ९०० कनेक्शन सुरू होणे बाकी आहेत. ग्राहकांनी तक्रारी असल्यास संपर्क साधा. अजूनही काही विजेचे खांब बदलणे, विजेच्या तारा बदलणे ही कामे सुरूच असल्याचे जागोजागी दिसून येत आहे.
यामुळे महावितरण कंपनीने आता वाड्यावस्तीवरील वीजग्राहकांसाठी संपर्क यंत्रणा सुरू केली आहे. ग्राहकांनी काही तक्रार असल्यास आपल्या उपविभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी केले आहे.