मंदार गोयथळे -असगोली -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावागावात मजुरांच्या हाताला काम अशी संकल्पना राबवत, सार्वजनिक कामांबरोबरच वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना शासनाने देऊ केल्या. मात्र, या कामांमधील ६० टक्के मजूर अकुशल, ४० टक्के कुशल कारागिरांच्या वापरातील निकषामुळे गुहागर तालुक्यातील अनेक गावातील ६० टक्के अकुशल प्रमाण पूर्ण होत नसल्याने वैयक्तिक लाभाची गतवर्षातील अनेक कामे प्रलंबित आहेत. अकुशल मजुरांच्या अल्प प्रतिसादामुळे या योजनेतील अनेक वैयक्तिक लाभाची कामे प्रलंबित राहिल्याचे दिसून येते. प्रशासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला या योजनेतून जास्तीत जास्त कामे सुचवण्यासाठी प्रेरित केले जात असले तरी प्रत्यक्ष कामे घेताना ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाला मात्र हे काम डोकेदुखीचे ठरत आहे. एकीकडे योजना राबवायची, तर दुसरीकडे अकुशल कामगारांचा अत्यल्प प्रतिसाद. यामुळे योजनेतून आवश्यक प्रमाणात लाभ देता येत नसल्याचेही चित्र पाहायला मिळते. या योजनेमध्ये सुरुवातीला तालुक्याचे ६० टक्के अकुशल, तर ४० टक्के कुशल कामगारांचे प्रमाण धरले जात होते. मात्र, आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रमाण ठरल्याने त्या त्या ग्रामपंचायतींमध्ये अकुशल कामावर खर्च होणाऱ्या निधीच्या प्रमाणात कुशल कामांसाठी निधी प्राप्त होणार आहे. यामुळे प्रथम सर्वाधिक अकुशल मजुरीची कामे व्हावी लागत आहेत. रस्ते, वृक्ष लागवड व सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे ही कामे अकुशल मजूरांमध्ये येत आहेत. मात्र, यासाठीचे प्रस्ताव दाखल झाले नाहीत.गतवर्षात ६५ ग्रामपंचायतींमधून रस्त्याकरिता केवळ आठ प्रस्ताव दाखल झाले आहेत. वृक्ष लागवडीकरिता पाच प्रस्ताव दाखल झाले मात्र ही कामे अपूर्ण आहेत. सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यासाठी सात प्रस्ताव दाखल झाले असून, चार कामे पूर्ण झाली असून, अजून तीन कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. नरेगामधील प्राप्त निधी प्रथम अकुशल मजुरांवर खर्च पडला नसेल तर वैयक्तिक लाभाच्या कुशल मजुरांकरिता ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये निधी वर्ग होत नाही. परिणामीकामे वंचित राहिली आहेत.
गुहागरात ६० टक्के मजूर अकुशलच...
By admin | Published: August 07, 2015 10:34 PM