संकेत गोयथळे ल्ल गुहागररत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गेला एक महिना सातत्यपूर्ण ३०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरु आहे. ही वीज रेल्वेसाठी दिली जात आहे. झारखंड व पश्चिम बंगाल राज्यांतील रेल्वेसाठी वीज पाठवण्यासंदर्भात तांत्रिक मंजुऱ्या अंतिम टप्प्यात असून, आणखी ३०० मेगावॅट वीज निर्माण करण्यात येणार असून, नवीन वर्षात ६०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होणार आहे.तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून २६ नोव्हेंबरला वीजनिर्मिती सुरु झाली. २१५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी बंद प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अनेक अडचणींनंतर प्रकल्पातून सरासरी १ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सकडून होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर तयार होणारी महाग वीज घेण्यास कोणी तयार नसल्याने डिसेंबर २०१३पासून प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद होती.उर्जामंत्री पियुष गोयल यांनी पहिल्यांदा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर हालचाली सुरु झाल्या. ५०० मेगावॅट वीजनिर्मिती खरेदीला रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला. यासाठी दिल्ली येथील विशेष समितीने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीज घेण्यास रेल्वेला सेंट्रल इलेक्ट्रीकल रेग्युलेट्री अॅथॉरिटीचा (सीईआरसी) परवाना मिळाल्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी रेग्युलेट्री कमिशनची मंजुरी नोव्हेंबरमध्ये मिळाली. यानंतर महाराष्ट्र रेल्वेसाठी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आली. याचाच दुसरा टप्पा म्हणून झारखंड व पश्चिम बंगाल रेल्वेसाठी आणखी ३०० मेगावॅट वीज घेण्यासाठी रेल्वेने आवश्यक तांत्रिक प्रशासकीय मंजुऱ्या मिळणे आवश्यक होते. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने आणखी तीनशे मेगावॅट वीजनिर्मितीची भर पडून नवीन वर्षात रत्नागिरी गॅस प्रकल्पातून एकूण ६०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होणार आहे.पहिला टप्पा प्रिझर्वेशनमध्ये : तिसरा टप्पाही सुरु करण्यात येणारप्रकल्पातून तीन टप्प्यातून वीज निर्मिती होऊ शकते. सध्या टप्पा दोनमधून ३०० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून, आणखी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती करताना तिसरा टप्पाही सुरु करण्यात येणार आहे. पहिला टप्पा प्रिझर्वेशनमध्ये ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
नवीन वर्षात ६०० मेगावॅट वीज
By admin | Published: December 26, 2015 11:58 PM