मालवण (जि. सिंधुदुर्ग) : ‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते.बंदर विभागाने मच्छीमारांना समुद्रात जावू नये अशा सूचना केल्या आहेत. कुलाबा वेधशाळेने ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिला असून वादळ शमत नाही तोपर्यंत नौकांनी बंदर सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत.केरळ, तामिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आणि समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती जाणवू लागताच सिंधुदुर्गासह केरळ, तामिळनाडूच्या बोटींनी शुक्रवारी देवगड बंदराचा आसरा घेतला. शनिवारी वातावरण निवळल्याचे दिसताच या बोटींनी घरची वाट धरण्याचा निर्णय घेतला. परंतु अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि पोलीस तसेच वेधशाळेने दिलेल्या सूचनेमुळे या बोटी पुन्हा मालवण आणि देवगड बंदरात विसावल्या. देवगड बंदरात सुमारे १०० नौका दाखल झाल्या असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पर्यंत मच्छीमारी नौका देवगड बंदरात दाखल होत होत्या.धोक्याचा बावटा लावणारसध्या समुद्रात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले असून चार फूट उंचीच्या लाटा उसळतील, असे हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे धोक्याची सूचना म्हणून बंदरात दोन नंबरचा बावटा लावणार आहे.- सुषमा कुमठेकर,बंदर निरीक्षक
मालवण, देवगड बंदरात ६०० खलाशांनी घेतला आसरा, वादळ शमत नाही तोपर्यंत बंदर सोडू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:36 PM