रत्नागिरी : जिल्ह्यात आता दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. केवळ मे महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांमुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या येथील विभागाला ६८,४१,४१३ रूपये इतका महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षभरात ५९७९ पर्यटकांनी महामंडळाच्या निवासव्यवस्थेचा लाभ घेतला. यातून पाच कोटी रुपये पर्यटन विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. कोकणातील निसर्गसौंदर्याचे आकर्षण आता वाढू लागले आहे. चित्रपटनिर्मातेही आता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चित्रिकरणासाठी येऊ लागले आहेत. गणपतीपुळे हे धार्मिक तसेच पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे. या ठिकाणी पर्यटनाबरोबरच गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर हे ठिकाणही पर्यटकांना भुरळ घालत आहे. पर्यटन विकास महामंडळातर्फे गणपतीपुळे आणि वेळणेश्वर या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने निवास व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत २०१४ - १५ या वर्षात गतवर्षीपेक्षा १५७० ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या तीन ठिकाणी फेरीबोट सुरू असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. फेरीबोटीमुळे अंतर कमी होतेच, पण इंधन बचतही होत असल्याने पर्यटक फेरीबोटीला पसंती देत आहेत. गणपतीपुळे जयगड आणि जयगड ते तवसाळ, बागमांडला ते वेसवी आणि गुहागर ते दाभोळे अशा तीन फेरीबोटी सध्या सुरू आहेत. पर्यटन विकास महामंडळाच्या निवास न्याहरी योजनेला सध्या पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्यातून स्थानिकांनाही उत्तम रोजगार मिळत आहे. गणपतीपुळे, मुरूड, गुहागर भागात या योजनेचा लाभ बहुसंख्य पर्यटक घेत आहेत. गणपतीपुळेत डिसेंबर २०१४पासून पर्यटन महामंडळाने आठ प्रीमिअर सूट सुरू केले आहेत. मुख्य निवासात ३२ खोल्या वातानुकुलित तर ४२ साध्या आहेत. पर्यटकांचा हंगाम अगदी १५ जूनपर्यंत सुरू राहणार असल्याने महालाभात आणखी भर पडेल. (प्रतिनिधी)
एका महिन्यात ६८ लाख रुपये उत्पन्न, पर्यटन महामंडळाला ‘महा’लाभ
By admin | Published: June 07, 2015 12:49 AM