कणकवली : येथून नजीकच असलेल्या जानवली-रामेश्वरनगर येथील ७ फ्लॅट व २ बंगले फोडून चोरट्यांनी सुमारे ७९ हजार रुपये रोख व ६० हजारांचे दागिने लंपास केले. रामेश्वर नगरातील रहिवाशी साखरझोपेत असताना चोरट्यांच्या टोळक्याने हा धुमाकूळ घातला. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. पण श्वानपथकाच्या हाती काहीही लागलेले नाही. ठसेतज्ज्ञालाही पाचारण करून ठसे घेण्यात आले आहेत. ही घटना शनिवारी रात्री २ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत प्रशांत जयंत रसाळ (रा. जयभवानी कॉम्प्लेक्स, जानवली-रामेश्वरनगर) व प्रदीप श्रीपाद मांजरेकर (रा. नाधवडे, ता. वैभववाडी) यांनी कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रशांत रसाळ हे रामेश्वरनगर येथील रासम यांच्या फ्लॅट क्र. ५ येथे भाड्याने राहतात. त्यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
रसाळ यांची आई व स्वत: प्रशांत रसाळ हे घर बंद करून रात्री रुग्णालयात गेले होते. याचाच फायदा चोरट्यांनी उठविला व त्यांच्या बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले २५ हजार रुपये रोख व ४८ हजार ४00 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. कपाटातील आतील लॉकरमध्ये ठेवलेला दीड तोळे वजनाचा सोन्याचा हार, १ ग्रॅम वजनाचे कानातील डूल, २ ग्रॅम सोन्याची साखळी, तिरुपती देवाचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, गणपतीचे २ ग्रॅम सोन्याचे लॉकेट असे मिळून ४८ हजार ४00 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला.जयभवानी कॉम्प्लेक्समधील सुरेश मालवीय यांचा फ्लॅट फोडून कपाटातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, त्यांची पत्नी उर्मिला मालवीय यांचे २ ग्रॅम वजनाचे कानातील बाळी जोड, एक चांदीचा पैजण जोड असा ११ हजार ५००चा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच श्रीकृष्ण नारायण महाडिक व सुहास वसंत गुरव यांचाही फ्लॅट फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
जयभवानी कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा ऋग्वेद अपार्टमेंटकडे वळविला. ऋग्वेद अपार्टमेंटमधील कांचन दिगंबर मांजरेकर यांचा फ्लॅट कडी कोयंड्याने फोडून रोख ५४ हजार रुपये लंपास केले. तसेच विष्णू सायबा बालटकर व सुधीर गोपीनाथ साळवी यांचाही फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रदीप श्रीपाद मांजरेकर (रा. नाधवडे, ता. वैभववाडी) यांनी कणकवली पोलिसांत माहिती दिली आहे.पहाटे ४ वाजता श्रीकृष्ण महाडिक यांनी प्रशांत रसाळ यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी ताबडतोब आजूबाजूला चौकशी केली असता जयभवानी कॉम्प्लेक्समधील ४ फ्लॅट फोडल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलीस ५ वाजता पोहोचले. तोपर्यंत चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. प्रदीप मांजरेकर हे भजनाच्या कार्यक्रमाला गेले होते व त्यांची वहिनी कांचन ही बहिणीच्या साखरपुड्याला मुंबईला गेली होती. चोरट्यांनी हीच संधी साधून रोख रक्कम लंपास केली.शिक्षक कॉलनीमधील गणपती मंदिर येथील दळवी व महाडिक यांचा बंगलाही चोरट्यांनी फोडला. मात्र चोरट्यांना या बंगल्यामध्ये काहीही हाती लागले नाही. जयभवानी कॉम्प्लेक्समधील एका नागरिकाने चोरट्यांना पाहिले. हे चोरटे बुरखाधारी होते, असे नागरिकाचे म्हणणे आहे. या नागरिकाने दोघांना फोन केला. मात्र रात्री झोपेत त्यांचा फोन कुणी घेतला नाही. चोरट्यांना पाहूनही नागरिकांना जागे न केल्यामुळे चोरटे सहीसलामत निसटले. या अज्ञात चोरट्यांविरोधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.श्वानपथकाला पाचारणपोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व त्वरित श्वासपथकाला पाचारण केले. श्वानपथक ऋग्वेद अपार्टमेंट येथे येऊन घुटमळले. ऋग्वेद अपार्टमेंट येथे चोरट्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावून चोरी झाल्यानंतर गाडीतून चोरटे पसार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.सीसीटीव्ही बसविणाररामेश्वरनगर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी यापूर्वी केली होती. मात्र रहिवाशांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. आता या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रयत्न रहिवाशी करणार असल्याची चर्चा आहे.घटनास्थळी वस्तू आढळल्याघटनास्थळी चादर व टॉवेल पोलिसांना आढळून आले. घाईगडबडीत पळताना चोरटे चादर व टॉवेल विसरून गेले . ७ ते ८ जणांची टोळी असावी असा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला आहे. पांडुरंग नाईक या रहिवाशाने सहा ते सात चोरट्यांना पाहिले, असे घटनास्थळी रहिवाशांनी सांगितले.१00 नंबर बंद असल्याने नाराजीपहाटे चारच्या दरम्यान रहिवाशी चोरीबाबत पोलिसांना माहिती देत होते. मात्र १00 नंबर बंद असल्याबाबत रामेश्वरनगर येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.या घटनेमुळे महिलांही भयभीतरामेश्वरनगर हे मुंबई-गोवा महामार्गानजीकच आहे. २ महिन्यांपूर्वी रामेश्वरनगर येथे बंद फ्लॅट फोडून साडेपाच लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. आता याच नगरात पुन्हा चोरी झाल्याने महिलांनी भीती व्यक्त केली आहे.