दोडामार्ग : भरधाव दोन एस.टी बसची एकमेकांना बाजू देताना रस्त्याच्या खाली घळणीत घसरून अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. त्यातील तिघांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून चार जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास हेवाळे - बांबर्डे येथे घडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून बसेसची समोरासमोर धडक वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.दोडामार्ग-विजघर ही एस टी बस विजघरहून दोडामार्गच्या दिशेने येत होती तर सावंतवाडीहून बेळगावच्या दिशेने दुसरी बस जात होती. या दोन्ही बसेस हेवाळे - बांबर्डे येथे वळणावर आल्या असत्या एकमेकांना बाजू देताना रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्यावरून खाली घळणीत घसरल्या अन् अपघात झाला. अपघातात वैभव लक्ष्मण नाईक (वय -१३ रा.विजघर), भागीरथी हुलगप्पा बंडीवद्दर (५० रा. बेळगाव), हुलगप्पा गंगाप्पा बंडीवद्दर (६० रा. बेळगाव), बागुबाई कोयी पटकारे (७३ रा. पारगड), शशिकला शांताराम बेर्डे (६२ रा. पारगड), परशु कृष्णा पाटील (५३. रा. चंदगड), रिया मालू गवस (१४ रा. विजघर) सर्वेश घाडी (३५ रा.विजघर) असे सात प्रवासी जखमी झाले.जखमींना तातडीने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी चार जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर तिघांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी तीन जणांना अधिक उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य प्रवाशांना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. एस टी चालक अतिवेगात वाहने चालवत असल्याचा आरोप अनेकदा होत होता. तो आज खरा ठरला .
Sindhudurg: बाजू देताना भरधाव दोन बसचा अपघात, ७ प्रवासी जखमी; अन् अनर्थ टळला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 03, 2023 6:15 PM