कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतर्गत जनतेतून थेट नगराध्यक्ष तसेच १७ पैकी १६ नगरसेवक निवडण्यासाठी शुक्रवारी शांततेत ७६.९७ टक्के मतदान झाले. गेल्या तीन निवडणुकांपेक्षा यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नगराध्यक्ष पदासाठीच्या ४ तर नगरसेवक पदासाठीच्या ५५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, आता प्रभाग १0 मध्ये नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर १२ एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहिर केला जाणार आहे. दरम्यान, गेल्या तीन निवडणुकांपेक्षा यावर्षी मतदानात वाढ झाल्याने निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे. कणकवलीतील १६ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ७.३0 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. ९.३0 वाजेपर्यंत १६.३३ टक्के मतदान झाले होते. दुपारी ११.३0 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. वृध्द मतदारांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. या वेळेपर्यंत ३५.८४ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ५३.८५ टक्के मतदान झाले. या वेळेपर्यंत ६ हजार ३६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तिसºया टप्प्याच्या अखेर ३ हजार २९४ पुरुष आणि ३ हजार ६९ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळेपर्यंत सर्वात जास्त प्रभाग २ मध्ये ६४.८५ तर सर्वात कमी प्रभाग ५ व ७ मध्ये ४७.0८ टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी ३.३0 वाजे पर्यंत ६७.५८ टक्के मतदान झाले होते. तर ५.३0 वाजेपर्यंत एकूण ७६.९७ टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरुन मतदान यंत्रे येथील तहसील कार्यालयात कर्मचाºयांनी जमा केली. ती ‘स्ट्रॉन्ग रूम’ मध्ये ठेवण्यात आली आहेत.जनता स्वाभिमानला कौल देणार !ही लढाई कणकवलीच्या विकासाची आहे. कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमानचीच सत्ता येणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यावर कणकवलीकरांचा विश्वास आहे. त्यामुळे जनता स्वाभिमानलाच आपला कौल देईल. अशी प्रतिक्रिया आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केली.नेत्यांकडून मतदानाचा आढावा!आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, समीर नलावडे, प्रमोद जठार, सतीश सावंत, दत्ता सामंत, रेश्मा सावंत, अतुल रावराणे, राकेश राणे, विलास कोरगावकर यांसह प्रमुख पदाधिकाºयांकडून मतदान केंद्रांना भेट देवून मतदानाचा शुक्रवारी दिवसभर अधून मधून आढावा घेण्यात येत होता.कडक पोलिस बंदोबस्त !नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांच्या देखरेखीखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन पोलिस निरीक्षक , १२ उपनिरीक्षक व ९१ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यात प्रत्येक बुथवर एक पोलिस तर बूथ पासून १00 मिटर अंतरावर एक अधिकारी, चार कर्मचारी , एक हत्यार बंद पोलिस व व्हिडिओ कॅमेरामन ठेवण्यात आले होते. सहा इमारतीमध्ये मतदानासाठी १६ मतदान केंदे तयार करण्यात आली होती. सहा इमारतींचे तिन सेक्टर करण्यात आले होते. तर प्रत्येक सेक्टर वर पोलिस अधिकारी , व्हिडिओ कॅमेरामन व हत्यार बंद पोलिस ठेवण्यात आला होता. तसेच शहरात दोन दंगा काबू पथकेही तैनात ठेवण्यात आली होती.विजय आमचाच होणार !कणकवली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी मतदान केल्यानंतर निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचे दावे प्रसिद्धी माध्यमांसमोर केले आहेत. यामध्ये संदेश पारकर, समीर नलावडे, राकेश राणे यांचा समावेश होता.
कणकवलीत ७७ टक्के मतदान; नगरपंचायत निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 8:13 PM