दोडामार्ग : न्यायाच्या अपेक्षेने अर्जाद्वारे आर्त विनवणी करूनही पंचायत समितीकडून दखल घेतली नसल्याने घोटगे येथील ८० वर्षीय वृद्ध सदाशिव दळवी यांच्यावर कुटुंबासहित भर पावसात उपोषणास बसण्याची वेळ आली. मात्र, यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी यशस्वी शिष्टाईने उपोषण मागे घेतले. अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत गोरगरीब जनतेची पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.घोटगे येथील सदाशिव दळवी यांनी कुटुंबासहित तहसील कार्यालयासमोर मंगळवारी उपोषण छेडले. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध प्रशासनाकडे निवेदन दिले होते. त्यात असे म्हटले की, रामा दळवी व जगनाथ दळवी हे आमचे शेजारी. त्यांनी माझ्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करून माझ्या घराच्या भिंतीला लागूनच बांधकाम केले आहे. तेथून ये-जा करण्यास तसेच पाण्याचा निचरा होण्यास अवघड झाले आहे.
भविष्यात माझ्या घराला धोका उद्भवणार आहे. सरपंच, ग्रामसेवकांच्या निदर्शनास आणून देत ७ मे रोजी लेखी निवेदनाद्वारे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी केली होती तसेच पंचायत समितीला देखील २१ मे रोजी लेखी निवेदनाद्वारे न्यायासाठी याचना केली होती. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी तब्बल २१ दिवसांनी म्हणजे ११ जून रोजी ग्रामपंचायतीमार्फत अनधिकृत बांधकाम काढण्याचे पत्र ग्रामसेवक यांना दिले. मात्र, कारवाई करण्यात आली नाही.नाईलाजास्तव दळवी कुटुंबीयांना भर पावसात तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची वेळ गाफिल प्रशासनामुळे आली. अखेर जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवींनी अधिकारी व उपोषणकर्त्यात चर्चा करून तोडगा काढला. दहा दिवसांत संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल, अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, असे पत्र देऊन उपोषण मागे घेतले. यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव व ग्रामसेवक, सरपंच, भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, कार्यकर्ते उपस्थित होते.ग्रामसेवकांचा पर्दाफाशग्रामसेवकांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. सातबारा दिला नसल्याचे कारण सांगून अर्ज निकाली काढल्याचे उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्याचा गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांच्यासमोर दळवी यांनी पदार्फाश केल्याने ग्रामसेवक निरूत्तर झाले.