सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गाला पर्यटनदृष्ट्या बळकट करण्यासाठी तसेच तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करता बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडविण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. याची माहिती रविवार ५ जून रोजी शरद कृषी भवन येथे होणाऱ्या कार्यशाळेत दिली जाणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी ८२ कोटी रूपये निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यासाठी चार योजना आखण्यात आल्या आहेत. याची इत्यंभूत माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. याबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानाचे विशेष कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी चांदा ते बांदा योजना व माझा गाव माझा विकास, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पर्यटन यांचा समावेश आहे. किनारपट्टीतील पर्यटनदृष्ट्या सक्षम गावांंचा विकास अपेक्षित आहे. तर ग्रामीण पर्यटन अंतर्गत जिल्ह्यातील पाच समूह पर्यटन गटांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत त्या समुहामधील गावात निवास, न्याहारी, साहसी पर्यटन, खाडी पर्यटन याद्वारे पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. त्याचा वापर करून विविध खाद्यपदार्थ, टिकाऊपदार्थ, बचत गटामार्फत बनवून त्यांची विक्री हमी देऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांना व पर्यायाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.मालवण मधील स्कुबा डायव्हींग बरोबरच शिरोडा येथे स्कुबा डायव्हींग प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचदृष्टीने या कार्यशाळेत सांगोपांग चर्चा होणार अशी माहिती यावेळी दीपक केसरकर यांनी दिली.(प्रतिनिधी)चिपी विमानतळावर : २0१७ मध्ये विमान उतरणारचिपी येथील धावपट्टीचे काम पूर्णत्वास आले असून त्याचे स्थापत्य तयार झाले आहे. या वर्षात येथील वीजजोडणीचे काम पूर्ण होईल. या धावपट्टीची क्षमता अडीच किलोमीटर आहे. या धावपट्टीवर सर्वच प्रकारची विमाने उतरू शकतात. गोव्यातील विमानतळही अडीच किलोमीटर धावपट्टीचे आहेत. ज्यावेळी या विमानतळाचे भूमिपूजन होईल. तेंव्हा चिपीची धावपट्टी पूर्ण होऊन विमाने उतरू लागतील. सध्यस्थिती पाहता जून २०१७ मध्ये या धावपट्टीवर विमान उतरू शकेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.४0 हजार जनता अद्याप दारिद्र्यरेषेखालीजिल्ह्यातील ४० हजार जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यांच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वर्धीनीद्वारा गावाच्या विकासाबरोबरच दारिद्र्य रेषेच्याखालील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.सी-वर्ल्डसाठी येथील ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे सी-वर्ल्डसाठी आवश्यक साडेतीनशे हेक्टर जमीन संपादित करून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल.- दीपक केसरकर, पालकमंत्री
विकास आराखड्यासाठी ८२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2016 11:06 PM