सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यात ९१५ मतदार केंद्रे असून जिल्ह्यातील ६ लाख ५९ हजार ७५७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. असे असले तरी निवडणूक जाहीर होईपर्यंत मतदरांची नाव नोंदणी सुरु असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात २१७४ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदनाच्या दिवशी शासकीय वाहनांतून मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच उन्हाची झळ मतदरांना बसू नये यासाठी मतदान केंद्रावर ग्रीन नेटच्या सहाय्याने सावलीची सोय केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे आचारसंहितेच भंग अथवा मतदान केंद्रावर होणारे अनुचित प्रकार यांची तक्रार सर्वसामान्य जनतेला करता यावी यासाठी शासनाने सी-व्हिझल नावाचे अॅप तयार केले आहे.
या अॅपद्वारे तक्रार नोंद करता येणार असून त्यावर १०० मिनिटांत कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, गौरव आरोसकर आदि उपस्थित होते.