कणकवली : काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैभववाडीमध्ये पोलिसांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर आता कणकवली वनविभागातील वनरक्षक नारायण भास्कर शिर्के (वय-५०, रा. कळसुली) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. वृक्षतोड व वाहतुकी संदर्भातील कामाकरिता ४० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कणकवली तालुक्यातील जानवली येथील वनविभागाच्या कार्यालयातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल, गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे लाकूड व्यवसायिक असून त्यांनी कणकवली तालुक्यातील नागवे येथील जंगलातील लाकूड तोडून त्याची वाहतूक करण्याची परवानगी मिळण्याकरीता जानवली येथील वनक्षेत्रपाल कार्यालय येथे सुमारे ३ महीन्यापूर्वी अर्ज दिलेला होता. त्या अनुषंगाने त्यांनी लाकूड तोड व वाहतूक मार्च २०२३ अखेरीस पूर्ण केली. वाहतुकीच्या मुदतवाढीसबंधी विचारपूस करण्याकरीता तक्रारदार हे वनक्षेत्रपाल कार्यालयात गेले होते. यावेळी वनरक्षक नारायण शिर्के यांनी तक्रारदाराकडे याकामासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता शिर्के यांनी नागवे याकामासाठी तडजोडीने ३५,००० रूपये लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ संशोधन २०१८ चे कलम ७, ७ अ अन्वये लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार याने संशयित नारायण शिर्के याला ३५ हजार रुपये देण्याचे निश्चित केले. गेल्या ८ ते १० दिवसांपासून ही चर्चा चालू होती. तक्रारदार यानी संशयिताबरोबरचे बोलणे रेकॉर्ड केले होते. त्यानंतर शिर्के याला संशय आल्याने पैसे स्वीकारण्यास तो टाळाटाळ करत होता. अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.शिर्के याला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच चौकशीनंतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तसेच त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, आस्मा मुल्ला, हवालदार जनार्दन रेवंडकर, निलेश परब, रविकांत पालकर, जितेंद्र पेडणेकर, अजित खंडे, प्रथमेश पोतनीस, कांचन प्रभू आदींच्या पथकाने केली.दरम्यान, या कारवाईनंतर वनविभागामध्ये एकच खळबळ उडाली असून, यापूर्वी कणकवली वन विभागामधील अनेक कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले होते.त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती आता पुन्हा या विभागात लाचखोरी बळावल्याने अखेर कणकवलीतील एका तक्रारदाराने या विभागातील या लाचखोर कर्मचाऱ्याचा पर्दाफाश केला.
वृक्षतोड, वाहतुकीच्या कामाकरीता मागितली ४० हजारांची लाच, कणकवलीत वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
By सुधीर राणे | Published: May 12, 2023 1:08 PM