कुडाळ : जमिनीचा सातबारा देण्यासाठी जमीन मालकाकडे ३ हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी तुळसुली तर्फ माणगावच्या तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठी बाळासाहेब शामराव शिंदे याने स्वत:साठी व मंडल अधिकारी यांचे करीता लाचेची मागणी केली. याप्रकरणी तलाठी शिंदे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या बाबत माहिती अशी की, तक्रारदाराने तुळसुली तर्फ माणगाव येथे सुमारे ५ गुंठे जमीन खरेदी केली. खरेदी प्रमाणे ७/१२ च्या अभिलेखात नोंद होणे करीता खरेदीची प्रत तलाठी कार्यालयात दिली. यानंतर तक्रारदाराने तलाठी शिंदेची भेट घेवून ७/१२ संदर्भात विचारपूस केली. यावेळी तलाठी शिंदे याने तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली.याप्रकरणी तलाठी शिंदेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ कलम ७, ७ अ अन्वये कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शिंदे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लाचेची मागणी करणाऱ्या तुळसुली तर्फ माणगावच्या तलाठ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 7:05 PM