सावंतवाडी : रोणपाल- सोनुर्ली येथील घनदाट जंगलात एक वृद्ध विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना आज, शनिवारी सकाळी एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली. गेले दोन-तीन दिवस मुसळधार पावसात अन्न पाण्याशिवाय असल्याने या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा असा सावंतवाडीपोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.याबाबत माहिती अशी, सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलातून शनिवारी सकाळपासूनच मोठमोठ्याने किचळण्याचा आवाज येत होता. तेथेच गुरांना चरण्यासाठी एक गुराखी गेला होता. त्याला हा आवाज ऐकू आला. त्याने आवाजाच्या दिशेने जात शोध घेतला असता झाडाला एका महिलेला साखळदंडाने बांधलेले आढळले. ही घटना बघून तो गुराखी घाबरून गेला आणि त्याने गावात येऊन ग्रामस्थांना प्रकार सांगितला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कटावणीच्या साह्याने हे साखळदंड तोडले. गेल्या दोन ते तीन दिवसापासून ही महिला पावसात भिजली होती त्यामुळे तिच्या हातापायांना सुज आली होती. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा आवाज बाहेर येत नव्हता. तिच्याकडे काही कागदपत्र मिळाली त्यात त्या महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. ती मूळची अमेरिकन नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या उजव्या पायाला साखळदंडा घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आल्याने तिचा पाय सुजला होता. बाकी अंगावर कुठेही जखम आढळून आली नाही तिला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सुधारत असली तरी अद्याप पर्यत तिला बोलता येत नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महिलेच्या पतीवरच संशय व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी महिलेची विचारपूस केली असून रूग्णालयात आणून तिचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
मडुरा रेल्वे स्थानकावर उतरून सोडल्याचा अंदाज घटनास्थळावरून मडुरा रेल्वे स्थानक हे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटावर असून कदाचित कृत्य करणाऱ्या व्यक्तिने मडुरा स्थानकावर उतरून नंतर तिला रोणापाल येथील जंगलात नेले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पोलिस अद्याप तशी पुष्टी करताना दिसत नाही.