कुडाळ: कर्नाटक वनविभागाच्या विविध गुन्ह्यातील फरारी संशयित आरोपीस मालवणमध्ये ताब्यात घेण्यात आले. कमलाकर नाईक (रा. शिराली, ता. भटकळ, जि. उत्तर कर्नाटक) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. वनपरिक्षेत्र कुडाळ व कर्नाटकातील वनपरिक्षेत्र मानकी येथील टीमने संयुक्त कारवाई करत मौजे कातवड येथे ही कारवाई केली.याबाबत माहिती अशी की, शासकीय जंगलातील मौल्यवान साग वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याने कमलाकर नाईक यांच्यावर वन अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. मागील दोन दिवसापासून तो ठिकाणे बदलून वनविभागाच्या पथकास हुलकावणी देत होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले.नाईक यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये तसेच अनुसूची ३ मधील वन्यप्राणी सांबराच्या शिकारीसाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी एस एन रेड्डी व उपवनसंरक्षक रवीशंकर सी. होनावर (कर्नाटक राज्य ) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे (कुडाळ), सविता देवाडिगा (वनपरिक्षेत्र मानकी), श्रीकृष्ण परीट (वनपाल मालवण), सावळा कांबळे (वनपाल मठ), महेश पाटील, दत्तगुरु पिळणकर, उप वनपरिक्षेत्र अधिकारी मानकी संदीप आरकसाली, योगेश मोगेर व ईश्वर नाईक यांनी केली.
कर्नाटकातील फरार संशयित आरोपीस मालवणमध्ये घेतलं ताब्यात, कुडाळ-कर्नाटक वनविभागाची संयुक्त कारवाई
By सुधीर राणे | Published: November 25, 2022 4:12 PM