दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : मोर्ले येथे चार हत्तींच्या कळपाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. तेथील शेतकऱ्यांचे २००० हून अधिक केळी, २०० हून अधिक सुपारी व ५० हून अधिक माड उद्ध्वस्त केले. याखेरीज शेतीच्या पाण्याची पाइपलाइन, कुंपण उद्ध्वस्त केले. यात शेतकरी संतोष मोर्ये, सरस्वती मसुरकर, चंद्रकांत बेर्डे व सत्यवान बेर्डे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.मागील काही दिवसांपासून टस्कर व पिल्लाच्या एका कळपाचा केर, मोर्ले परिसरात वावर होता. तर टस्कर, मादा हत्ती व दोन पिल्ले अशा चार हत्तींचा कळप बांबर्डे परिसरात वास्तव्यास होता. तस्कर व पिल्लू अन्नाच्या शोधात भ्रमंती करत हेवाळे गावात पोहोचला. मात्र तेथे दोन्ही कळपातील टस्कर आमने-सामने आले व एकमेकांना भिडले. चार हत्तींच्या कळपातील टस्कर हा मोठा असल्याने दोन हत्तींच्या कळपातील टस्कराला त्याने पिटाळून लावले व मोठा टस्कर ही त्यांच्या मागे धावला. तेव्हापासून त्याचा केर, मोर्ले परिसरातच वावर आहे.
तिलारी खोऱ्यात एकूण सहा हत्तींचा वावर असून त्यापैकी चार हत्तींनी मोर्ले येथील केळी, सुपारी व नारळाच्या बागायती उद्ध्वस्त केल्या आहेत. मोर्ले गावचे उपसरपंच असलेले शेतकरी संतोष मोरया यांच्या फळबागायतीत घुसून हत्तींनी सुमारे दोन हजार केळींचा फडशा पाडला. तसेच दोनशे सुपारी व ५० माड उद्ध्वस्त केले. शिवाय त्यांनी शेतीसाठी केलेली पाण्याची पाइपलाइन, शेतीसाठी बांधलेले संरक्षक कुंपण ही उद्ध्वस्त केले आहे. याखेरीज शेतकरी सरस्वती मसूरकर यांची सुपारींची मोठी झाडे जमीन दोस्त केली. सत्यवान बेर्डे व चंद्रकांत बेर्डे यांच्या देखील सुपारी व माड उद्ध्वस्त केल्या.
कष्टाने फुलविलेली फळबागायती डोळ्यादेखत नष्टयात चारही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या फळबागायती डोळ्यादेखत नष्ट झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. वनविभागाने या हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली.
वाढीव नुकसान भरपाई द्यावी : संतोष मोर्येहत्ती प्रश्नासंदर्भात तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करण्याचे पाप सरकार करत आहे. शेतकऱ्यांना मुंबईत बोलावून हत्ती हटाव संदर्भात घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. तिलारी खोऱ्यात सध्या सहा हत्तींचा वावर असून शेतकऱ्यांची मोठी हानी सुरू आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये यांनी केली आहे.