कणकवली : गोवा ते मुंबई जाणाऱ्या एका खासगी बसने प्रवास करणाऱ्या सोने व्यापाऱ्याचे चोरट्याने रोख रक्कमेसह दागिने लंपास केले. दरम्यान नांदगाव येथील एका हॉटेलमध्ये बस जेवण्यासाठी थांबली असताना ते हॉटेल मध्ये जेवायला गेले. तेवढ्यात त्यांच्या बॅगेतील ६० हजार किंमतीची सोन्याची नथ व रोख रक्कम ३ हजार रुपये लांबवले. काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी भैय्यासाहेब मोतीराम मोरे (वय ५४ रा. चारकोप , कांदिवली) हे गोव्यात सोन्याच्या विक्रीचा व्यवसाय गेले अनेक वर्षे करतात. काल गुरुवारी ते डॉल्फिन या खासगी बसने गोव्यावरुन मुंबईकडे प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या बॅगेत शिल्लक राहिलेल्या सोन्याच्या नथ होत्या. नांदगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बस थांबली असता ते जेवायला गाडीतून उतरले. जेवण झाल्यानंतर पुन्हा गाडीत आले असता बॅगची चैन उघडी दिसली. बॅगेत बघितल्यावर सोन्याच्या नथ तसेच रोख ३ हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी कणकवली पोलिसांची संपर्क साधला. खासगी बस पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सर्व प्रवाशांकडे चोरीबाबत विचारणा केल्यानंतर रात्री उशीरा बस मुंबईकडे रवाना झाली. मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Sindhudurg: प्रवासादरम्यान खासगी बसमधून व्यापाऱ्याचे दागिने लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 30, 2024 3:22 PM