पुणे : केरळ पाठोपाठ सिंधुदूर्ग येथे कोविडच्या जेएन.वन या विषाणूची लागण झालेला रूग्ण आढळल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून दवाखान्यांमध्ये संशयित रूग्णांची माहिती घेऊन चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच मॉक ड्रील घेऊन आरोग्य यंत्रणेची सक्षमता ही तपासण्यात आलेली आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये, मात्र नियमीत व स्वच्छ हात धूणे, मास्कचा वापर करण्यावर भर देण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
केरळ येथे कोविडच्या जेएन.वन विषाणूचे रूग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रातील सिंधूदुर्ग येथेही जेएन.वन विषाणूची बाधा झालेला रूग्ण आढळला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी झाली. त्यामध्ये कोविडच्या जेएन.वन विषाणुच्या पार्श्वभुमीवर योग्य खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.
शहरात कोविड सक्रीय रूग्णांची संख्या सात असून दर आठवड्याला दिडशे चाचण्या केल्या जात आहेत. एका रूग्णाचा जिनोम सिक्वेंसिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला आहे. शहरातील सर्व दवाखान्यांमध्ये संशयित रूग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दवाखान्यात येणाऱ्या संशयित रूग्णांचे नमुने घेणे, त्यांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकतीच "मॉक ड्रील' घेतली आहे, त्यामध्ये उपलब्ध खाटा, आयसीयू सुविधा, ऑक्सीजन,औषधसाठा, मनुष्यबळ यांचा आढावा घेण्यात आला असल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले.
""शहरात कोरोनाच्या जेएन.वन विषाणू संक्रमीत एकही रूग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगून योग्य उपाययोजना करण्यात येत आहे.नागरीकांनी घाबरून जाऊ नये, आवश्यक काळजी जरूर घ्यावी. '' डॉ.भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका.