बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी गुरुवारी पहाटे तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत २६ लाख २० हजार ८०० रुपयांच्या दारूसह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बाबासाहेब बबन यादव (४१, रा. सर्जेपूर, सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत माहिती अशी की, बांदा पोलिस तपासणी नाक्यावर मुंबईकडे जाणारा टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला. टेम्पोच्या दर्शनी भागासह मागील बाजूसही नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. टेम्पोत स्क्रॅप असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, अधिक तपासणी केली असता त्यात दारूचे बॉक्स आढळून आले.टेम्पोत विविध कंपन्यांचा २६ लाख २० हजार ८०० रुपयांचा दारूसाठा आढळून आला. तसेच सुमारे १० लाख रुपये किमतीचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला.ही कारवाई बांदा सहायक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले, सुनील पडवळ, हेड काॅन्स्टेबल सीताकांत नाईक, काॅन्स्टेबल राकेश चव्हाण, राजेंद्र बर्गे यांच्या पथकाने केली.
Sindhudurg: गोवा बनावटीच्या दारूसह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, सोलापुरातील एक जण ताब्यात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 05, 2023 5:53 PM