कणकवली: वारगाव, रोडयेवाडी येथील एका व्यक्तीजवळ गांजा आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रवीण आत्माराम गुरव (वय ५२) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २ हजार ५०० रुपये किंमतीचा ८३ ग्राम गांजा, चिलीम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. गुरव याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गांजा विक्रीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने वारगाव येथील प्रवीण गुरव यांच्या राहत्या घरी जात तपासणी केली. यावेळी पाच पॅक बंद पाऊच मध्ये हिरवट रंगाच्या उग्र वासाचा गांजा सदृश पदार्थ व एक चिलीम आढळून आली. गांजा व चिलीम जप्त करून प्रवीण गुरव याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपण गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. याबाबतची तक्रार स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे हवालदार किरण देसाई यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्यावतीने अवैध गांजा विक्री व खरेदी करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. असे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले.
गांजा बाळगल्याप्रकरणी वारगाव येथील एकजण ताब्यात
By सुधीर राणे | Published: November 13, 2023 12:23 PM