संदीप बोडवेमालवण (जि. सिंधुदुर्ग) : राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे व भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता जोरदार धुमश्चक्री झाली. एकमेकांवर दगडफेक, चिखलफेक, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलिस कर्मचारी आणि एक महिला जखमी झाली आहे. दीड तासानंतर तणाव निवळला.दरम्यान, दोन्ही नेते आमने सामने आल्याने त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर परिसरात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काही झाले तरी माघार घेणार नाही यावरून दोन्ही गट ठाम होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी बुधवारी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाविकास आघाडीचे नेते आले होते. त्याचवेळी खासदार नारायण राणे हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचले होते. यादरम्यान, दोन्ही गट किल्ल्यामध्ये आमने सामने आले आणि वादाची ठिणगी पडली.
राजकोट किल्ल्यामध्ये उद्धवसेना गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलिस यंत्रणेला न जुमानता एकमेकांवर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. तसेच किल्ल्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना भाजपा नेते नीलेश राणे यांची पोलिसांसमवेत शाब्दिक चकमक उडाली.
राणे-वडेट्टीवार यांच्यामध्ये हस्तांदोलनदरम्यान, राजकोट किल्ल्यामध्ये भेट देत असताना नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांची भेट झाली होती. तसेच दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले होते. त्यानंतर नारायण राणे राजकोटावर पाहणीसाठी पोहोचले.
जयंत पाटील यांची मध्यस्तीकाही वेळात आदित्य ठाकरे यांचेही राजकोट किल्ल्याच्या परिसरात आगमन झाले. त्यानंतर राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली. तर आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यात प्रवेश देणार नाही अशी भूमिका घेतली. तर पंधरा मिनिटात वाट मोकळी केली नाही तर आम्ही किल्ल्यात घुसू असा इशारा उद्धवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. मात्र, घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीमुळे वातावरण अधिकच चिघळले. दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.
काही पोलिस, कार्यकर्ते जखमीयावेळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरताना मोठी कसरत करावी लागली. या धुमश्चक्रीत काही पोलिस व कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली. ज्यावेळी दोन्ही गट एकमेकांना भिडले तेव्हा राजकोट किल्ल्याच्या नव्याने बांधण्यात आलेल्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.