सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्विमिंग पूलात पोहण्यासाठी आलेल्या ग्लेन जाॅन डिसोझा (20 रा.चराठे सावंतवाडी) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुलाने स्विमिंग पूलात उडी मारल्यानंतर तो वरच आला नसल्याचा दावा तेथे प्रशिक्षण देणाऱ्यांनी केला आहे. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तसेच मुलांच्या बॅगे मोबाईल सह इतर साहित्य ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.सावंतवाडी नगरपरिषदेचे जिमखाना मैदाना शेजारी स्विमिंग पूल असून गेली अनेक वर्षे ते बंद होते. मात्र मागील पाच महिन्यांपासूनच सावंतवाडी नगरपरिषद कडून ते खाजगी ठेकेदारास चालवण्यास देण्यात आले होते. त्याचा ठेका शहरातीलच संस्थेला देण्यात आला होता.ते येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण देत होते.ग्लेन डिसोझा हा एक महिन्यापूर्वीच याठिकाणी आला होता. तो चांगला प्रशिक्षित ही झाला होता. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो स्विमिंग साठी आल्यानंतर त्याने प्रथम स्विमिंग पूलात उडी मारली मात्र तो बराच वेळ तो वरच आला नसल्याने लागलीच प्रशिक्षकांनी त्याला बाहेर काढले तो पर्यत तो बेशुद्ध झाला होता. त्याला स्विमिंग पूलातून बाहेर काढून येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले पण रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.घटनेनंतर नगरपरिषद चे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी याठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षकाकडून माहिती घेतली तसेच ग्लेन यांचे कपडे मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर ग्लेन याच्या नातेवाईकांना पोलिसांनी संपर्क केला. नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्काच बसला पोलीसांनी त्यांना कसेबसे सावरले. तरीही त्याचा घटनेवर विश्वास बसत नव्हता. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिस करीत आहेत.कुणाचा निष्काळजीपणा झाला, याचा शोध घेऊआम्ही सध्या माहिती घेत आहे.यात कुणाची चूक झाली का?कुणाच्या निष्काळजी पणा मुळे ग्लेन यांचा मृत्यू झाला का ?हे सर्व तपासण्यात येणार असून त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी यावेळी सांगितले.घटनेने खळबळ व भीतीचे वातावरण नगरपरिषद कडून ज्या संस्थेला ठेका देण्यात आला त्यांनी या पूर्वी कुठे प्रशिक्षण दिले होते का याबाबत पोलीस माहिती घेणार असून सावंतवाडीतील स्विमिंग पूलात हा पहिलाच प्रकार घडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.
सावंतवाडीत नगरपरिषदेच्या स्विमिंग पुलात बुडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 11:49 AM