सिंधुदुर्ग- आंघोळीसाठी समुद्रात उतरलेला बेळगाव येथील युवक बुडाल्याची घटना रविवारी दुपारी शिरोडा-वेळागर येथे घडली. अलबकश जावेद मुजावर (१९) रा. देशनूर, बेळगाव, असे त्याचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुरज तसेच मदन अमरे, संतोष भगत, संजय नार्वेकर यांनी मिळून अखेर त्याला पाण्याच्या बाहेर काढले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
बेळगाव येथील दिलवर बुढेभाई हे आपली पत्नी, बहीण आणि भाचा याच्यासह शिरोडा येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण शिरोडा वेळागर येथे पोलचले. काही वेळाने सर्वजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. दिलावर हे आपला भाचा अलबकश यांच्या सोबत समुद्राच्या पाण्यात आंघोळ करू लागले. तर त्यांची पत्नी व बहीण किनाऱ्यालगत पाण्यात आंघोळ करीत होते.
दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अलबकश याला पाण्याचा अंदाज न आल्याने व लाटांचा मारा सुरु असल्याने तो पुढे पुढे सरकत गेला. आणि घाबरलेल्या अलबकश याने वाचवा म्हणून आरडा ओरड सुरू केला. मामा दीलवर यांना ही धोका लक्षात आल्याने त्यांनीही मदतीसाठी आरडा ओरड सुरू केली. समुद्रात कोणीतरी बुडत आहे हे समजताच सर्वजण किनाऱ्याकडे धावले.
अलबकश हा खोल पाण्यात गटंगळी घेत होता हे पाहून किनाऱ्यावरून सुरज अमरे, मदन अमरे, संतोष भगत यांनी पाण्यात उड्या घेतल्या. तो खूप खोल पाण्यात गेल्याने सुरज अमरे यांनी जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात जाऊन त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. पण अवघ्या दोनते तीन मिनिटात अलबकश पाण्यात बुडाला. तरीही त्याला बाहेर काढून किनाऱ्यावर आणले पण तो मृत पावला होता. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.