सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणवासीयांना काही आश्वासने दिली. कोकण जगातील पर्यटकांचे आकर्षक केंद्र आहेच. मात्र, जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. (Aaditya Thackeray on Chipi Airport Inauguration Programme)
संपूर्ण कोकणवासीयांकडे खरोखरच आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. पर्यटन मंत्री म्हणून आश्वासन देतो की, कोकणच्या विकासासाठी अग्रेसर असू. या ठिकाणी येताना विमान लँड करत असताना कोकणाचे अद्भूत सौंदर्य पाहिले. निळे पाणी, लाल माती, मनमोहक समुद्र किनारा पाहिला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचाच जिल्हा आहे. या जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. त्यादृष्टीनेच पुढील काळात काम आणि योजना आखणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर
महाराष्ट्रातील कोकण हे संपूर्ण जगभरात पर्यटनाचे एक प्रमुख आकर्षण केंद्र असून, यापुढे जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी काय करू शकतो, याकडे लक्ष देणार आहे. राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत कोकणच्या विकासासाठी नवीन योजना आणण्यावर काम करणार आहोत. चांगल्या बसेस, चांगली वाहतूक आणि ५ स्टार हॉटेल आणणार आहे. मात्र, पर्यटनावर भर देताना पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याकडेही अधिक लक्ष दिले जाईल, विमानतळाच्या माध्यमातून पर्यावरण जोपासत कोकणचा विकास करूया, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
दरम्यान, अनेक वर्षांनी विमानतळाचा हा योग आला. अनेक वर्ष काम प्रलंबित होते असं अनेक जण म्हणतात. परंतु काम पूर्ण होण्यासाठी पायगुणही लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने, पायगुणाने हे काम पूर्ण झाले. खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने या विमातळासाठी पाठपुरावा केला. पाठपुरावा झाला नाही, असा एकही महिना त्यांचा गेला नाही. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे कोकणवासीयांचा उत्कर्ष होईल. सर्वांनी चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केले तर काय होते हे या विमानतळाच्या दृष्टीने दिसून येते. कोकणवासीयांची जी स्वप्न आहेत ती नक्कीच साकार होतील. या विमातळामुळे पर्यटन वाढणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले.