मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीदेवी यात्रा लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात पार पडली. दीड दिवस सुरु असलेल्या यात्रोत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी मोडयात्रेने झाली. दीड दिवसात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. गुरुवारी सायंकाळनंतर गर्दीने विक्रमी उच्चांक गाठला. तर दुसऱ्या दिवशी मोडयात्रेलाही भाविकांची गर्दी दिसून आली.दरम्यान, गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून देवीला प्रसाद लावण्याचा सोहळा पार पडला. देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे सुहासिनी महिलांनी डोक्यावर घेत आणली. त्यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादाची ताटे देवालयात आणण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी पाहावयास मिळाली. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन बंद ठेवण्यात आले होते. शुक्रवार सकाळपासून भाविकांच्या दर्शनाच्या रांगा भरलेल्या होत्या. मोडयात्रेच्या शेवटच्या टप्प्यातही हजारो भाविकांनी दर्शन घेतले.गुरुवारी रात्री मंदिर परिसर शेकडो दुकानांच्या साक्षीने उजळून गेला होता. तर देवीच्या मंदिरावर करण्यात आलेली लक्षवेधक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. यावर्षीही लेझर किरणांचा वापर करण्यात आला होता. लेझर किरण व ड्रोन प्रणाली लाखो भाविकांचे आकर्षण ठरले. गजबजलेली खाजा-मिठाईची दुकाने तसेच मनोरंजनात्मक प्रकारांना मोठा प्रतिसाद लाभला तर शुटींगबॉल, कबड्डी स्पर्धांना क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंगणेवाडी यात्रेत भराडी देवीच्या यात्रेस येणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय नियोजनात व्यस्त होते. त्यामुळे शुक्रवारी मोड यात्रेच्या दिवशी आंगणे कुटुंबीयांनी रांगेत उभे राहून श्री देवी भराडी देवीचे दर्शन घेतले. पोलीस प्रशासन तसेच अन्य स्वयंसेवकांनी मेहनत घेऊन यात्रा सुरळीत पार पाडली. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस, महसूल, आरोग्य, वीज आदी प्रशासकीय यंत्रणा तसेच आंगणे कुटुंबीय मुंबई मंडळ व स्थानिक मंडळ तसेच आंगणे परिवाराने परिश्रम घेतले.आंगणेवाडी भराडी देवीच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवात दुसऱ्या दिवशीही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी देवीचे दर्शन घेतले. मोड यात्रेदिवशीही हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा मोड यात्रेची उत्साहात सांगता झाली. (प्रतिनिधी)
आंगणेवाडी यात्रोत्सवाची सांगता
By admin | Published: March 03, 2017 11:36 PM