चिपी (सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक, पोलिसांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करत याचा निषेध केला.
चिपी येथे आज टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी जिल्हाभरातून पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी दाखल झाले होते. मात्र आयआरबी कंपनीने पत्रकारांना बसण्यासाठी व्हीआयपी कक्षाच्या पाठीमागे व्यवस्था केली. यात चित्रीकरणासाठी उभ्या असलेल्या मीडियाच्या पत्रकारांना भाजपाच्या सदाशिव ओगले यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यावर संतप्त पत्रकारांनी त्यांना याचा जाब विचारला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही पत्रकारांनी चांगलेच धारेवर धरले. यात वाद निर्माण झाल्याने घटनास्थळी आलेल्या पोलिस अधीक्षक तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत त्यांना बाहेर काढले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.
वाद झाल्याचे लक्षात येताच भाजपाचे प्रमोद जठार, आमदार वैभव नाईक यांनी बाहेर येत झालेल्या प्रकाराची माफी मागत ज्याने अपमान केला त्याला बाहेर काढत तुमच्या बसण्याची व्यवस्था केली आहे असे सांगितले. मात्र जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या भावना तीव्रपणे मांडल्या. यावर जठार यांनी तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल असे सांगत पत्रकारांना कार्यक्रमस्थळी नेत बसविले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मंगळवारी (5 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. साडेतीन किमीची धावपट्टी असलेल्या या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरवण्याची सुविधा आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्याभविष्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. यापूर्वी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खासगी विमान उतरविण्यात आले होते. मात्र आज अधिकृतरित्या शासकीय उद्घाटन झाले आहे. चिपी विमानतळ जिल्ह्यातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, विकासाला चालना देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा फायदा निश्चितच येथील लोकांना होणार आहे.
गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेताच 'आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर काम करतो', असा टोला लगावला आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. सिंधुदुर्गचिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत उपस्थित होते.