कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्या कुडाळ मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींनाही एसीबी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सोमवारी (३० जानेवारी)ला संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आमदार नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा आशयाची नोटीस एसीबी रत्नागिरी विभागाने बजावली आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसीबीने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ आहे.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीमार्फत मालमत्तेसंदर्भात काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर या विभागाकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच या चौकशीला आपण भीक घालत नसल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केली होती. अलीकडेच त्यांच्या मालमत्तेसंदर्भात एसीबी विभागाकडून मोजमापे घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींना थेट रत्नागिरी एसीबी विभागाकडून नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांबाबत चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित कामांची सर्व कागदपत्रे, बॅंक खाते व अन्य आवश्यक कागदपत्रांसह ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, रत्नागिरी येथे उपस्थित राहावे, असे संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये एसीबी विभागाचे उपअधीक्षक यांनी नमूद केले आहे. या प्रकाराने आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे म्हटले जात असून, आमदारांनंतर आता थेट सरपंचांना एसीबी विभागाकडून चौकशीसाठी नोटीस पाठविल्याने खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना एसीबीच्या नोटीसा, आमदार वैभव नाईकांच्या फंडातून झालेल्या कामांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 1:18 PM