फोंडाघाट : देवगड-निपाणी राज्य मार्गावर हवेलीनगर, फोंडाघाट येथे जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या कार्यालयासमोरील खड्ड्यांनी एक बळी घेतल्याच्या घटनेला २६ तास उलटूनही बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही अथवा हालचाल झाली नसल्याच्या निषेधार्थ येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बळी गेलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
गावातील नागरिकांच्या प्रक्षोभ शिगेला पोहोचला असून सामाजिक कार्यकर्ते भाई हळदिवे यांनी बांधकामचे अधिकारी भातुसकर यांची कानउघाडणी करताना आणि किती बळी पाहिजेत? अशी विचारणा केली.अति पावसामुळे काम करणे अशक्य आहे, अशी थातूरमातूर उत्तरे ते देत आहेत. यापूर्वी अथवा दिवसातून पाऊस कमी असेल तेव्हा खड्ड्यांची डागडुजी का करीत नाही? या प्रश्नांवर ते गप्प राहिले. पाऊस कमी होताच टिकाऊ रस्त्याचे वचन देण्यास ते विसरले नाहीत.सोशल मीडियावर वृक्षारोपणाचे फोटो झळकताच संबंधित खात्याचे फोन वाजू लागले. आणि तातडीने वैभववाडीकडील टिकाऊ मुरुम टाकून खोल खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरु केले. मात्र सर्व घाटमार्ग बंद असल्याने फोंडा-घाटमार्गे होणारी वाहतूक, जड वाहने, परतीचे चाकरमानी, स्थानिक वाहतूक यांचा बोजा पडून सध्याचा रस्ता खिळखिळीत होण्याच्या मार्गावर असून याचाही विचार बांधकाम विभागाने भविष्यात करणे महत्त्वाचे आहे.धडक देऊन पसार झालेल्या टॅँकरला शोधण्यातही पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे फोंडाघाट परिसरात प्रशासनाच्या कामाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. अजून किती जणांचा जीव जाणार...? असा संभ्रम निर्माण झाला आहे.