सिंधुदुर्ग/सावंतवाडी : बांद्याहून मालवण गोठणेच्या दिशेने जाणाऱ्या कारला झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे भीषण अपघात झाला. त्यामुळे, जखमीना बांदा येथील 108 या रुग्णवाहिकेच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात हलविण्यात येत असतनाच चक्क अपघातापासून काही अंतरावर रूग्णवाहिकेनेच पेट घेतला. अपघातात अपघाताची ही घटना घडली. मात्र, रूग्णवाहिकेच्या चालकासह वैद्यकीय अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींना पेटत्या रूग्णवाहिकेतून बाहेर काढत दुसऱ्या रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलविण्यात आले.
स्वत:चा जीव धोक्यात घालून रूग्णवाहिकेचे चालक सावळाराम गवस व वैद्यकीय अधिकारी अनघा बांद्रे यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. झाराप पत्रादेवी महामार्गावरील नेमळे येथे शनिवारी दुपारी अपघात झाला, हा अपघात एवढा भीषण होता की, कार मधील चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान या अपघाता नंतर जखमी विशाल हाटले याला बांदा येथील 108 रूग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, अपघात स्थळापासून काही अंतरावरच पुढे रूग्णवाहिका आल्यानंतर रूग्णवाहिकेनेच पेट घेतला.
सुरुवातीला चालक गवस यांना काहि समजले नाही.पण, नंतर रूग्णवाहिकेतून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसताच चालकासह रूग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी यांनी बाहेर येत जखमी हाटले यांना त्याच स्थितीत बाहेर काढले. त्यानंतर, दुसऱ्या रूग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, चालकाने क्षणाचा ही विलंब न लावता केलेल्या धाडसामुळे अपघातग्रस्त रुग्णाचा जीव वाचला. य वेळी वैद्यकीय अधिकारी बांद्रे यांनीही चालकाला मदत केली.
दरम्यान, सुरूवातीला शार्टसर्किटने लागलेली आग विझेल असे वाटत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले, त्यातच आगीत पूर्ण रूग्णवाहिका जळून खाक झाली त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचा अग्नीशमन बंब आणून रूग्णवाहिकेची आग विझविण्यात आली. पण रूग्णवाहिकेचा सांगाडा झाला होता. एवढा बाका प्रसंग असतानाही परिस्थिीजन्य धाडसी निर्णय घेतल्याने रूग्णवाहिकेच्या चालकासह वैद्यकीय अधिकाऱ्याचे मात्र कौतुक होत आहे.
रूग्णवाहिकेच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर
अनेक रुग्णवाहिका या रुग्णनिहाण करण्यासाठी वापरल्या जातात. मात्र, त्याची कोणतीही दुरुस्ती केली जात नाही, किरकोळ दुरुस्ती ही होत नसल्याने हळूहळू मोठ्या घटनांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच, असे प्रसंग घडतानाचे चित्र दिसून येते.