प्रकाश काळेवैभववाडी : भुईबावडा-रिंगेवाडी दरम्यान एका तीव्र वळणावर एसटी बस व आयशर टेम्पोमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज, बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात एसटी बसमधील सुमारे २० प्रवाशांना किरकोळ तर ४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित प्रवाशांवर भुईबावडा येथील जिल्हा परिषद रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की, विजयदुर्ग-पुणे एसटी बस व गगनबावड्याहून भुईबावडा मार्गे येणाऱ्या आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर धडक बसली. या धडकेत एसटी बसचा चालकाकडील दर्शनी भाग दबला गेला. धडक मोठी असल्याने एसटीमधील २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून यातील ४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. एसटीत एकूण ६५ प्रवासी प्रवास करीत होते. या प्रवाशांना पुढील उपचारासाठी वैभववाडी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांना भुईबावडा येथील डॉ. रविंद्र सावंत यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडण्यात आले आहे. यावेळी वैभववाडी पोलिस निरीक्षक अवसरमोल, तावडे, जायभाय, दिलपे व पडवळ दाख झाले. भालचंद्र साठे, सरपंच बाजीराव मोरे, भुईबावडा येथीत आरटीआयचे तालुकाध्यक्ष कुणाल मोरे, शिवसेनेचे रविंद्र मोरे आदी उपस्थित होते.
भुईबावड्यात एसटी बस-टेम्पोमध्ये अपघात, ४ प्रवासी गंभीर जखमी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 12, 2024 1:10 PM