कणकवली: कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव-ओटव फाटा येथील पुलावरील रस्ता दुभाजकाच्या संरक्षक कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. ही घटना काल, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना सुमारास अचानक मोठा आवाज झाला. या अपघातात एस.टी.बसचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिस पाटील वृषाली मोरजकर, भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत कार्यात मदत केली. तसेच मुलांनाही धीर दिला. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर तत्काळ कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत झोरे, माने, प्रणाली जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास सुरु आहे.
Sindhudurg: शाळेची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा अपघात, सुदैवाने दुर्घटना टळली
By सुधीर राणे | Published: December 04, 2024 11:29 AM