सावंतवाडी : येथील पर्णकुटी विश्रामगृहाच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर जांभूळ पडल्याने अनेकजण घसरून पडले. यात चौघे दुचाकी चालक जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती मिळतात माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांनी तात्काळ पालिकेचा बंब आणून रस्ता धुऊन घेतला. येथील विश्रामगृहा समोर जांभळीचे झाड आहे. त्या झाडावरील जांभळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडली आहेत. त्यामुळे रस्ता बुळबुळीत झाला आहे. सकाळी या रस्त्यावर अनेक जण पडले होते. त्यामुळे तक्रार केल्यानंतर बंबाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी पाणी फवारणी केली. परंतु व्यवस्थित रस्ता न धुतल्यामुळे हा भाग आणखी बुळबुळीत झाला व त्या ठिकाणी अनेक दुचाकी स्वार पडले. यात चौघेजण जखमी झाले आहे. हा प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी आलेल्या पालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर आणि देविदास आडारकर यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन बंबाला पाचरण केले व पूर्ण रस्ता धूवून काढला.
sindhudurg: मुख्य रस्त्यावर जांभळे पडल्याने दुचाकींचे अपघात, चौघे जखमी
By अनंत खं.जाधव | Published: June 09, 2023 5:47 PM