राजापूर : प्रांताधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून राष्ट्रीयत्वाचे दाखले दिल्याप्रकरणी शनिवारी राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी आशिष अरुण शिवणेकर याला अटक केली आहे. शनिवारी त्याला राजापूर दिवाणी न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रांताधिकारी यांच्या सहा महिन्यांपूर्वी गायब झालेल्या गोल सीलबाबत (शिक्का) प्रांताधिकाऱ्यांच्यावतीने निवासी नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांनी चोरीची फिर्याद राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेले अनेक दिवस प्रांतांच्या खोट्या सह्या करून विविध प्रकारचे शासकीय दाखले दिले जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. त्यातच बुधवारी प्रांत कार्यालयातच या खोट्या दाखल्यांच्या प्रती मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण बाहेर पडले. प्रारंभी या प्रकाराकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अखेर हे प्रकरण पत्रकारांपर्यंत जाताच कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. प्रांत कार्यालयातील जो गोल शिक्का सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेला होता व तोच शिक्का या प्रकरणात वापरला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार राजापूरचे प्रांत सुशांत खांडेकर यांनी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांना महा ई सेवा केंद्र नं. ३ व तेथील कर्मचारी आशिष शिवणेकर याच्या विरोधात तक्र्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. राजापूर शहरातील महा-ई-सेवा केंद्र नं. ३ मधून जैतापूर येथील विनायक भैरवनाथ मांडगुळकर व विशाल भैरवनाथ मांडगुळकर यांना प्रांताच्या खोट्या सह्या करून राष्ट्रीयत्वाचे दाखले दिल्याची तक्रार निवासी नायब तहसीलदार राजेंद्र्र बिर्जे यांनी दिली होती. त्यानुसार संशयित आरोपी म्हणून आशिष अरुण शिवणेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी या महा-ई-सेवा केंद्र नं. ३ मधील सर्व दस्तऐवज ताब्यात घेण्यात आला असून, तेथील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. त्या तक्रारीनुसार शनिवारी आशिषला अटक करण्यात आली. १ जानेवारी २०१५ पासून सर्व प्रकारचे दाखले आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ; ज्यांना महा-ई-सेवा केंद्रातून बारकोडशिवाय कोणताही दाखला मिळाला असल्यास तो त्यांनी लागलीच प्रांतकार्यालयात जमा करावा व पुन्हा नव्याने आपले प्रकरण दाखल करावे, असे आवाहन खांडेकर यांनी केले आहे. राजापूरच्या निवासी नायब तहसीलदारांना महा-ई-सेवा केंद्र नं. ३ व संशयित आरोपी आशिष अरुण शिवणेकर या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणाचा राजापूर पोलीस योग्यरितीने तपास करतील व यातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल. - सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी
बनावट दाखलेप्रकरणी अखेर आरोपी अटकेत
By admin | Published: February 15, 2015 12:38 AM