ओरोस : घेतलेले पैसे देत नसल्याच्या रागातून कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याचे अपहरण करून त्याला घरात डांबून बेदम मारहाण करण्यात आली होती. यात सिद्धिविनायक यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृताला सातार्डा येथील जंगल भागातील स्मशान भूमीत प्रेत जाळून त्याची राख व हाडे तेरेखोल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडल्याचे प्रकरण पोलिस तपास उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सिध्देश अशोक शिरसाट (४४) रा. पानबाजार कुडाळ, गणेश कृष्णा नार्वेकर, (३३) रा. माणगांव, सर्वेश भास्कर केरकर (२९) रा. सातार्डा, अमोल उर्फ वल्लंभ श्रीरंग शिरसाट रा. पिंगुळी यांना तत्काळ अटक असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस उपअधिक्षक विनोद कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, निवती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड आदी उपस्थित होते.
मारहाणीत मृत्यू, सातार्ड्यात मृतदेह जाळलायावेळी सौरभ अग्रवाल म्हणाले, मृत सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश विडवलकर हा आरोपी सिद्धेश शिरसाट याचेकडे कामाला होता. त्याने सिद्धेश शिरसाट व आरोपी गणेश नार्वेकर याचेकडून घेतलेले पैसे तो परत करत नव्हता. या कारणावरुन संशयितांनी सिदधीविनायक बिडवलकर याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीने अपहरण करुन त्याला कुडाळ येथे संशयित अमोल शिरसाट याच्या घरी आणून संशयितांनी जबर मारहाण केली. त्यात सिद्धिविनायकचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मार्च २०२३ मध्ये घडलेल्या गुन्ह्याची तक्रार मार्च २०२५ मध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपले तपासाचे कौशल्य यापरुन आरोपी यांचेकडे केलेल्या तपासात, तसेच मिळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे तसेच साक्षीदार यांचेकडे केलेल्या तपासाअंती अटक केली.
पुरावा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवरआरोपींनी केलेल्या गंभीर गुन्हयात पुरावा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. गुन्हयात आरोपींना गुन्हा करण्याकरीता अन्य कोणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले आहे अगर कसे ? याचाबत पोलिस अधिक तपास करीत असल्याची माहिती सौरभ अग्रवाल यांनी दिली.
असा रचला कट!आरोपीनी बिडवलकर याला निघृणपणे मारहाण करुन जीवे ठार मारल्यानंतर त्याचे प्रेताची विल्हेवाट कशा प्रकारे लावावी यासाठी आरोपींनी एकत्र बसून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. त्याप्रमाणे संशयित सिद्धेश शिरसाट याने वाहनाची सोय करुन बिडवलकर याचे प्रेत रात्री सातार्डा गावातील डोंगरात असलेल्या स्मशानभूमीत घेवून जावून जाळले. त्यानंतर मृताचे प्रेताची राख व हाडे अशी दोन सिमेन्टच्या गोणीमध्ये भरुन त्या गोणी सातार्डा पुलावरुन तेरेखोल नदीचे पाण्याचे पात्रात टाकून पुरावा नष्ट केला. तसे तपासात निष्पन्न झालेले आहे.
अनेक कलमांव्दारे गुन्हा दाखलगुन्हयात आरोपी यांनी प्रकाश बिडवलकर यास जीवे ठार मारुन, कट रचून त्याचे प्रेत जाळून, प्रेताची राख व हाडे नदीचे पाण्यात टाकून पुरावा नष्ट केल्याने आरोपी यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३०२, १२० (ब) व २०१ ही अधिकची कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
संशयित आरोपी शिरसाटवर हद्दपारीची कारवाई!यातील एक नंबर संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असून याचबरोबर आणि काही प्रस्ताव प्रलंबित असून ते प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी स्पष्ट केले.