देवगड : शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचा बुरंबावडे गावठणवाडी येथील बंगला फोडून तीन लाखांची रोख रक्कम व पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी सतीश मुरलीधर झाजम (४०) या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले आहे. या गुन्हयाची कारवाई गुरुवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जून रोजी अरुण दुधवडकर यांचा बुरंबावडे गावठणवाडी येथील बंगला फोडून अज्ञाताने बंगल्यातील रोकड व दागिने लंपास केल्याची तक्रार बंगल्याची जबाबदारी सांभाळणारे उदय पारकर यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली होती. त्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास ओरोस रेल्वे स्टेशन येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाला सतीश झाजम हा संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला.
त्यांनी चौकशीसाठी झाजम याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने बुरंबावडे गावठणवाडीतील चोरीची कबुली दिली. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने संशयित आरोपी झाजम याला विजयदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.झाजम हा सराईत चोरटातब्बल दोन महिन्यांनी बुरंबावडे चोरी प्रकरणातील संशयितास पकडण्यास पोलिसांना यश आले. संशयित झाजम हा सराईत चोरटा असून न्यायालयाने त्याला १९ पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.