देवगड : फणसगाव नरसाळेवाडी येथील ठासणीची बंदूक व रोख रकमेच्या चोरीप्रकरणात विजयदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेला संंशयित मंगेश ऊर्फ सचिन पवार (वय ४०, रा. वळिवंडे ) याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. फणसगाव-नरसाळेवाडी येथील रामकृष्ण राजाराम कदम यांच्या घरातून ११ आक्टोबरला काडतूस ठासणीची बंदूक व २२ हजार ५०० रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणाची तक्रार त्यांनी विजयदुर्ग पोलिसस्थानकात दिली होती. दरम्यानच्या काळात कदम यांना आपल्या घराशेजारी असलेल्या रस्त्याशेजारी चोरीस गेलेली बंदूक सापडली. विजयदूर्ग पोलिसांनी दरम्यानच्या कालावधीमध्ये चोरीचा संशय असणाऱ्या बऱ्याच संशयितांची चौकशी केली. चौकशीमध्ये सचिन पवार हा अट्टल चोर असल्याच्या संशयावरून व काही खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला तळेबाजार येथे बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पवार याने चोरीची कबुली दिली होती. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल होते. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्याने पलायन केले. गुरुवारी दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी विजयदुर्ग पोलिस ठाण्याला भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घतली. संशयिताला तत्काळ शोधून काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. फरार संशयितांच्या शोधासाठी बुधवारी रात्रीपासून पोलिसांनी सर्वत्र तीव्र शोधमोहीम सुरू केली असली, तरीही तो हाती लागला नाही. (प्रतिनिधी) माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ सचिन पवार याला तळेबाजार येथून ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणारे विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे ते चार कर्मचारी कोण, याची नावे देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या चोराला पकडण्याऐवजी त्या चार कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणातील वरिष्ठ पोलिस अधिकारी त्या चार पोलिस कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विजयदुर्ग पोलिस ठाण्यात वर्षाला २० ते २२ गुन्हे घडतात.
पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन
By admin | Published: October 13, 2016 11:59 PM