सावंतवाडी, दि. 4 - आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली व आंबोली येथील शोध पथकाला तब्बल पाचव्या दिवशी यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेला मृतदेह प्रताप अण्णासाहेब उजगरे (२४ रा.हुनगीखुर्द जि.बीड)यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी सहाव्या दिवशी एनडीआरएफचे पथक आंबोली येथे येणार असून, ते इम्रान गारदी याचा शोध घेणार आहेत.सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्रीत काम करणारे सात जण आंबोली-कावळेसाद येथे फिरायला आले होते. त्यातील दोघे जण मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करीत असताना खोल दरीत कोसळले. त्यानंतर चार दिवस कोल्हापूर व आंबोलीसह सांगेली येथील शोध पथके या युवकांचा शोध घेत होती. पण त्यांना यश येत नव्हते. त्यातच गुरूवारी सायंकाळी कोल्हापूर येथील शोधपथक निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शोधमोहीम सुरू केली होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास प्रताप उजगरे याचा मृतदेह खोल दरीच्या पायथ्याला असल्याचा दिसला. त्या मृतदेहा पर्यत किरण नार्वेकर व दाजी माळकर पोचले त्यांनी या मृतदेहाला रोप वेच्या साहय्याने बांधले त्यानंतर रोप वे वर ओढून घेण्यात आला ३ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह वर काढण्यात शोधपथकासह अन्य साथीदारांना यश आले.गडहिंग्लज येथील इम्रान गारदी याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने घेतला. पण दाट धुके तसेच पावसाचा प्रवाह मोठा असल्याने त्यात अनेक अडचणी येत असल्याने ही शोधमोहीम सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास थांबविण्यात आली आहे. पुन्हा हे पथक शनिवारी शोध घेणार आहे. तर शनिवारी एनडीआरएफचे पथकही आंबोली-कावळेसाद येथे दाखल होणार असून, तेही या मृतदेहाचा शोध घेणार आहेत.
आंबोली दरीत पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह काढण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 10:55 PM