सावंतवाडी : आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. गेल्या २ दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून घाटात अस्वच्छता करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, अशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कचरा टाकणाऱ्या २, धूम्रपान करणाऱ्या ३, मद्यपान करणाऱ्या २, तर माकडांना खाऊ घालणाऱ्या ६ व्यक्तींवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.वनविभागाकडून आवाहन केल्यानंतर सर्वच ठिकाणी आंबोली घाटात फलक लावण्यात आले असून गेल्या दोन दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व ११,५०० रुपये दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकणारे- २ व्यक्ती, धूम्रपान करणारे - ३ व्यक्ती, मद्यपान करणारे- २ व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- ६ व्यक्ती अशा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधता टिकविण्यासाठी मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करून तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.
आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई सुरू, ११ हजार रुपयांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:37 AM