कणकवली: अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवलीचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी कारवाई सुरू केली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व डंपरवर कारवाई केली. याप्रकरणी ६ लाख २ हजारांचा दंड केल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.या कारवाई अंतर्गत महसूलच्या पथकाने आचरा रस्त्यावरील बिडवाडी फाटा येथे ३ ट्रक व कलमठ येथे एक डंपर पकडला. या चार वाहनांवर ६ लाख २ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. या पथकात मंडल अधिकारी शंकर पाटील, नागावकर व तलाठी यांचा समावेश होता.कलमठ व कणकवली भागात रत्नागिरीच्या दिशेने वाळू घेऊन जाणारे तीन ट्रक व एक डंपर ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेली वाहने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभी करून ठेवण्यात आली आहेत. तर कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, किरण मेथे आदींच्या पथकाने मसुरकर किनई रोडवर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करत हा डंपर तहसीलदार कार्यालयाच्या स्वाधीन केला. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
Sindhudurg: कणकवली तहसीलदारांसह पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, ६ लाखांचा दंड
By सुधीर राणे | Published: October 30, 2023 12:59 PM