रत्नागिरी : हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेल्या केंद्रप्रमुखांच्या बाजूने सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. कारवाईसाठी निलंबन हा एकच पर्याय आहे का? असा प्रश्न शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णू पवार यांच्यावर शैक्षणिक कामात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवून शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईने शिक्षक व केंद्रप्रमुखांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शैक्षणिक कामात हलगर्जीपणा, बेपर्वाई तसेच शाळाबाह्य मुले प्रकरणी शिक्षक, मुख्याध्यापकांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र, बोगस पदव्या, बदलीसाठी खोटे दाखले देणारे शिक्षक तसेच विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांना अभय देण्याचे काम शिक्षण विभागाकडून केले जात असल्याचा आरोपही शिक्षक संघटनानी केला आहे. शिक्षक, केंद्रप्रमुख दोषी आढळून आल्यास निलंबनाऐवजी अन्यही कारवाई करता येऊ शकते, असा सूर शिक्षक संघटनामधून उमटत आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघ आणि केंद्रप्रमुख संघटना या शिक्षकांवर कारवाईविरोधात एकवटल्या आहेत. शनिवारी या सर्व संघटनांचे पदाधिकारी शिक्षण सभापती विलास चाळके आणि शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची भेट घेण्यासाठी परिषद भवनात सायंकाळच्या वेळेस आले होते. यावेळी केंद्रप्रमुख पवार यांच्यावरील व अन्य शिक्षकांवर उठसूट होत असलेल्या कारवाईबद्दल सभापती व शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र, शिक्षण सभापती कार्यक्रमानिमित्त ग्रामीण भागात तर शिक्षणाधिकारी मिटींगनिमित्त मुंबईत गेल्याने त्या दोघांचीही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे सभापती व शिक्षणाधिकारी या दोघांचीही लवकरच भेट घेऊन कारवाई संदर्भात व शिक्षकांच्या इतर प्रश्नांबाबत चर्चा करणार असल्याचे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
केंद्रप्रमुखांवर कारवाई; संघटना एकवटल्या
By admin | Published: February 22, 2016 12:16 AM