कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते अशी कृती करीत आहेत, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केली आहे.कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित संयुक पत्रकार परिषदेत राजन तेली व अतुल काळसेकर यांनी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जिल्हा बँकेने घेतलेल्या निर्णयाची नव्याने अंमलबजावणी करत असल्याचे सांगत सतीश सावंत हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत.
जिल्ह्यातील २६६ विविध कार्यकारी सोसायट्यांंपैकी ५० ते ५२ सोसायट्यांनीच कर्ज माफीच्या थकबाकीची अंमलबजावणी केली आहे. तर उर्वरीत सोसायट्या अडचणींचा सामना करत आहेत. जिल्ह्यातील सोसायट्या व खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून खत किंवा फवारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देत असतानाच अतिरिक्त २० टक्के रक्कम देण्याच्या योजनेचे आम्ही समर्थन करतो.
सावंत हे शेतकऱ्यांना १२० रुपये किलो दराने काजु बी खरेदी करण्यास सांगत आहेत. वास्तविक काजू बी साठवून ठेवल्यानंतर ती सुकल्याने ६ ते ९ टक्के येणारी तूट सोसायट्या कशा प्रकारे सहन करणार आहेत? याउलट जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेट पैसे कसे देता येतील? याचा विचार करावा. काजू बी एक वर्षभर ठेवली तरी त्यांना विना व्याज कोणतेही तारण न घेता रक्कम देता येईल का? याचा विचार करावा.
जिल्ह्यातील शेतकरी हे प्रामाणिक आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांचा विचार करण्यात यावा. याचप्रमाणे पणन महामंडळ वर्षाला कोट्यवधी रुपये बागायतदारांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करते. हा कर्ज पुरवठा या शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे वापरता येईल? याबाबतही विचार करावा.
अतुल काळसेकर यांनी शासनाकडे काजू बागायतदारांसाठी निधीची मागणी केली आहे. शासनाने १०० कोटींच्या निधीची तरतुद करुन ठेवली आहे. गोवा राज्याने तेथील बागायतदार संघाच्या माध्यमातून १०५ रुपये किलो दराने काजू बी खरेदी केली असून गोवा सरकार प्रतिकिलो २० रुपये अनुदान या शेतकऱ्यांना देणार आहे. तशाच प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाने राबवावी आणि शेतकऱ्यांना प्रतिकिलो २० रुपये अनुदान द्यावे. यातून सोसायट्यांनाही लाभ मिळू शकेल.
आज जिल्ह्यातील काजू व्यापारी ८५ ते ९० रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नाही. तर जिल्हा बँक १२० रुपये दरावर ठाम आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अभ्यास करुनच याबाबत निर्णय घ्यावा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण फसवणूक करत असाल तर भाजपा हे सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांना भाजपा पाठिंबा देईल. मात्र, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध करेल. जिल्ह्यातील सोसायटयांची अवस्था काजू बी खरेदी करण्याइतपत चांगली नाही.मोरगाव सोसायटीने ५ लाखांच्या कर्जाची मागणी केली आहे. उर्वरीत सोसायट्या का धजावत नाही? याचा विचार करावा. मच्छिमार व अन्य प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून चर्चा केली असल्याचे यावेळी राजन तेली यानी सांगितले.उज्ज्वला गँस योजनेचा लाभ घ्यासिंधुदुर्गात उज्ज्वला गॅस योजनेचे जवळपास ५० हजार ४६३ लाभार्थी आहेत. यातील आतापर्यंत १९ हजार ७४ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेताना सिलिंडरची नोंदणी केली आहे. ३० एप्रिलपर्यंत उज्ज्वला गॅस लाभार्थ्यांनी सिलिंडर घ्यावयाचा आहे. अन्यथा या योजनेचे पुढील अनुदान बँक खात्यात जमा होणार नाही. याची नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी. तसेच या योजनेचा लाभ उठवावा, असे आवाहन यावेळी अतुल काळसेकर यानी केले.
उज्ज्वला गॅस योजनेसाठी ३० दिवसांची असलेली मुदत ४५ ते ६० दिवसांपर्यंत करण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे यावेळी अतुल काळसेकर यांनी सांगितले.