कणकवली : अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने बुधवारी धडक कारवाई केली. तहसीलदार गणेश महाडिक यांनी महसुलच्या पथकासह काळ्या दगडाची खडी आणि ग्रीडची बेकायदेशीर वाहतूक करणारे पाच डंपर आणि एक ट्रॅक्टर अशी सहा वाहने ताब्यात घेतली असून त्यापैकी चार वाहनांचे पंचनामे करून २ लाख २४ हजार १२५ रुपयांचा दंड केला आहे.तहसीलदार गणेश महाडिक यांनी महसुल पथकासह मुंबई-गोवा महामार्गावर शहराजवळील गडनदीपुलानजीक सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. मंडळ अधिकारी आर.व्ही.गवस, शिवाजी सुतार, तलाठी अजय परब, शिरसाट, परुळेकर हे या कारवाईत सहभागी झाले होते. पकडलेले डंपर आणि ट्रॅक्टर चालकांकडे गौण खनिज वाहतूक परवान्याची मागणी करण्यात आली. त्यातील ३ वाहन धारकांकडे परवाने होते. तर २ वाहन चालकांकडे असलेल्या परवान्यांची मुदत संपलेली होती. पकडलेल्या वाहनांना येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. तसेच पंचनामे करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. सहापैकी दोन वाहन चालक आपली वाहने तहसील कार्यालयात उभी करून निघून गेले. त्यामुळे उर्वरित चार वाहनांचे पंचनामे करून त्यांच्यावर २ लाख २४ हजार १२५ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये तीन डंपर व एका टॅ्रक्टरचा समावेश आहे.तहसीलदार गणेश महाडिक यांच्या या धडक कारवाईने बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या गौण खनिज व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, १२ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे तहसीलदार गणेश महाडिक यांनी सांगितले. या निर्णयानुसार अनधिकृत जांभ्या दगडावर ३२,२०० रूपये, काळी खडी मोठी व छोटी ५०,८०० रूपये, काळी खडी पावडर ३७,८०० रूपये, माती ३२,८०० रूपये, काळा दगड ४०,८०० रूपये तर वाळू वर ६०, ८३२ रूपये दंड आकारण्यात येतो असेही त्यानी सांगितले. (प्रतिनिधी)
गौण खनिज वाहतुकीवर कारवाई
By admin | Published: January 04, 2017 11:13 PM