वैभववाडी : पूर्वग्रहदूषित आकस असल्याप्रमाणे वेतनाला विलंब करून शिक्षण विभाग शिक्षकांचा छळ करीत आहे. वेतन विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. समितीच्यावतीने शनिवारी वैभववाडी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षक नेते भाई चव्हाण, सुनील चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, संजय पाताडे, गजानन टक्के, लक्ष्मण ढवण, संजय रासम, रफीक बोबडे, प्रभाकर कोकरे, अनिल खांबल, गजानन अडुळकर, दीप्ती पाटील, जयश्री यादव, आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांचे वेतन दरमहा पहिल्या तारखेला देण्याबाबत शासनाचे आदेश असूनही कित्येक महिने वेतन वेळेत दिले जात नाही. तसेच वेतन फरक, शिक्षकांची प्रवास तसेच औषधोपचाराची देयके रखडलेली आहेत. सर्व शाळांना इंटरनेट सुविधा पुरविलेली नसतानासुद्धा मुख्याध्यापक आॅनलाईन वेतनपत्रके सादर करतात. मात्र, शिक्षण विभाग शिक्षकांच्या बँक खात्यात आॅनलाईन वेतन जमा करीत नसल्याने आॅफलाईन वेतन जमा होण्यास १0-१२ तारीख उजाडते. परिणामत: विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे वेळेत हप्ते भरले जात नसल्याने शिक्षकांना दंडात्मक व्याजाचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे वेतन विलंबाला जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. (प्रतिनिधी)
वेतन विलंबास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
By admin | Published: February 07, 2016 12:46 AM