मालवण,28 : पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर यांच्यावर राजकीय आकसापोटी जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. घाडीगावकर यांचे दारिद्र्यरेषेखाली यादीत नाव नसतानाही काही राजकीय व्यक्तींनी पदाचा वापर करून कारवाई करण्याबाबत अधिकाºयांवर दबाव आणला. पंचायत समितीत आमचे नेतृत्व करणाºया घाडीगावकर यांची प्रशासनाने केलेली नाहक बदमानी राजकीय द्वेषापोटी केली आहे, असा आरोप करत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली कारवाई निषेधार्ह आहे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर व अजिंक्य पाताडे यांनी मांडली.
सुनील घाडीगावकर यांनी २००२ पूर्वी दारिद्र्यरेषेखाली नाव यादीतून कमी करण्यास सांगितले होते. त्यानुसार झालेल्या २००२ व २००५ च्या सर्व्हेत त्यांचे नाव कमीही करण्यात आले होते. असे असताना अधिकाºयांना पाठीशी घालून निवडणुका डोळ्यासमोर कारवाई करण्यात आली आहे.
जनतेने आम्हाला निवडून दिले असून आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतो. घाडीगावकर यांनी धान्य उचल केली नसतानाही पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे त्यांच्यावर राजकीय आकसापोटी कारवाई करण्यात आल्याने निषेधाचा ठराव घेण्याची सूचना परुळेकर यांनी केली.
मालवण पंचायत समिती येथील छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती मनीषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, राजू परुळेकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, सागरिका लाड तसेच विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी मधुरा चोपडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. पर्यटन हंगाम सुरु झाला असतानाही देवबाग मार्गावर रस्त्यात खड्डे आहे. झाडीही दुर्तफा वाढली आहे. दिवाळीपूर्वी झाडी तोडण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तालुक्यातील खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले असून त्यानंतर झाडी तोडण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
वायरी-देवबाग मार्गावर पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी तसेच पर्यटकांकडून धिंगाणा केला जातो, त्यामुळे या मार्गावर पोलीस नियुक्त करावा, अशी सूचना मांडली. यावेळी गटविकास अधिकारी पराडकर यांनी पोलीस प्रशासनाला पेट्रोलिंगसाठी पोलीस तैनात करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले.
रेंज नसताना उदघाटन कशासाठी ?तालुक्यातील वायंगवडे येथील दूरसंचारच्या टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मात्र टॉवरला अद्यापही रेंज नाही. ग्राहकांना रेंज मिळत नसेल तर उदघाटन करण्याची घाई कशासाठी केली, असा सवाल अजिंक्य पाताडे यांनी उपस्थित केला. यावेळी दूरसंचारच्या अधिकाºयांनी उदघाटनाचा कार्यक्रम शासकीय होता, अशी सारवासारव करताना रेंज नोव्हेंबरपर्यंत सुरळीत होईल, असे स्पष्ट केले.
यावेळी परुळेकर व पाताडे यांनी टॉवर उभारणीसाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केला होता. मात्र प्रॉटोकॉलनुसार बोलावण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी गटविकास अधिकाºयांनी केंद्र सरकारचे नियम, प्रोटोकॉल वेगळे असतात, असे सांगितले.
उपसभापती आक्रमक
उपसभापती अशोक बागवे यांनी अवजड वाहनासाठी बंद असलेले कोळंब पूल, आचरा विभागातील वीज अधिकाºयांना धारेवर धरले. कोळंब पूल धोकादायक आहे, असे सांगून गेले काही महिने नागरिकांना आर्थिक भुर्दंड होत आहे. तसेच या मार्गावरून एसटी वाहतूकही बंद असल्याने बांधकाम विभागाच्या कर्मामुळे एसटीचे भारमान कमी झाले आहे. नागरिकांना होणारा त्रास व एसटीचे बुडालेले भारमानाला बांधकाम विभाग जबाबदार आहे, असा आरोप बागवे करत प्रवासी वाहतुकीसाठी पूल खुला करावा, अशा सूचना केल्या.
यावेळी बांधकामाचे अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी कोळंब पूल धोकादायक बनल्याने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी फेरनिविदा काढण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. तर आचरा विभागात विजेच्या समस्या कायम असून अधिकाºयांना कामे करायची मानसिकता नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत, अशी भूमिका मांडली.